सुशांत प्रकरणाची चौकशी लागताच फार फार बोलणारं पिल्लू गप्प झालं; नारायण राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
तुम्ही लोकांनी खोके घेतले म्हणता मग मातोश्रीवर आम्ही काय पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? आम्ही कुठे कुठे काय काय पोहोचवलं, मातोश्रीच्या कोणत्या मजल्यावर काय दिलं हे आता सांगायला लावून नकोस.
मुंबई: दुसरं एक पिल्लू फार फार बोलत होतं. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी लागल्यानंतर पिल्लू गप्प झालं. काय बोलतो? कशासाठी बोलतो? माणसं तरी ओळखता येतात का? असा हल्लाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. भांडूपमध्ये कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हे आता तुरुंगातच जातील असा दावाही त्यांनी केला.
इथे एक जवळच टिनपाट संपादक राहतो. मराठी माणसासाठी कोण काम करतय हे पाहा. त्यामुळे संजय राऊत तोंड बंद कर. मी देशात काम करतोय. तू खाल्लेल्या मिठाला जाग. माझ्या वाटेला कोणी जात नाही म्हणून संजय राऊत पोलीस सुरक्षेत राहा. नाहीतर जेलमध्ये जा, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे.
तू कोणाला सांगतो येऊन दाखव. त्या उद्धव ठाकरेंचे शिवसेनेत योगदान किती? आताचे शिवसैनिक हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. शिवसेना मोठी करण्यात माझं योगदान आहे. संपादक आहे तर चांगलं लिही. हा खासदार झाला हे माझं पाप आहे. एकदा बाळासाहेबांनी मला बोलावलं आणि याला संपादक बनव सांगितलं, असा दावाही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी शिवालयात संजय राऊतच्या विरोधात उमेदवार तयार ठेवला होता. पण मला बाळासाहेबांनी याचे नाव सांगितले होते. याचे नाव इलेक्शनच्या यादीत नव्हते. त्याला काँग्रेसच्या रोहिदास पाटील यांनी विरोध केला. हा खासदार बनवायला खर्च मी केला.
खर्च मी सांगणार नाही आणि हा मला विचारतो? असा सवाल करतानाच आता याची रवानगी जेलमध्येच होईल. एवढी हेराफेरी याची आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
नारायण राणे शिवसेनेत असताना कोणी शिवसेनेतून बाहेर जात होतं का? आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत. शिवसेनेची आताची अवस्था प्रचंड वाईट आहे. 40 आमदार दिवसाढवळ्या निघून जातात. अन् खोके घेऊन आमदार गेल्याचं हे म्हणत आहेत.
तुम्ही लोकांनी खोके घेतले म्हणता मग मातोश्रीवर आम्ही काय पुष्पगुच्छ घेऊन जायचो का? आम्ही कुठे कुठे काय काय पोहोचवलं, मातोश्रीच्या कोणत्या मजल्यावर काय दिलं हे आता सांगायला लावून नकोस, असा इशाराही त्यांनी दिला.
आणि हे अडीच वर्ष बसले मुख्यमंत्री म्हणून पण काय केल? कोकणसाठी फक्त बढाया मारल्या. पण केलं काय? विमानतळ मी केलं. विनायक राऊत विरोध करत होते. त्याला टक्केवारी हवी होती.
भाजपची देशात सत्ता आली आणि नितीन गडकरी यांच्याकडून टेंडर काढलं आणि सिंधुदुर्गचे रस्ते केले. मी आता सिंधुदुर्गात फाईव्ह स्टार हॉटेल सुरु करतोय. कारण मी राजकारणी आहे. पण मी व्यावसायिक सुद्धा आहे, असं ते म्हणाले.