मालेगाव सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्यांकडून ‘जोर का झटका’
मालेगाव सभेासाठी नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. एकीकडे नाशिकमधून 100 बसेस अन् 15000 कार्यकर्ते सभेसाठी जाणार आहेत. तर दुसरीकडे शेकडो कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.
निखिल चव्हाण, ठाणे : उद्धव ठाकरे यांची कोकणात सभा झाल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात जाहीर सभा होत आहे. रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची मालेगावात जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी नाशिक जिल्ह्यात जोरात सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभेसाठी नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. नाशिकमधून 100 बसेस अन् 15000 कार्यकर्ते सभेसाठी जाणार आहेत. नाशिक शहरातील वेगवेगळ्या विभागातून बसेस मालेगावकडे रवाना होणार आहे. परंतु त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. त्यामुळे सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना नाशिकमधून धक्का बसला आहे.
ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेत
नाशिक येथील ठाकरे गटातील तसेच इतर पक्षातील 500 हून अधिक कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला. ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात हा पक्ष प्रवेश झाला. महिला आघाडी, तरुण वर्ग, तसेच जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा झाला.
मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जेव्हापासून बाळासाहेबांची भूमिका स्वीकारून सर्वसामान्यांचा सरकार स्थापन केले. सरकारने गेल्या आठ-नऊ महिन्यांत घेतलेले निर्णय व आता सादर झालेला अर्थसंकल्प हा सर्व घटकांची अपेक्षा पूर्ण करणारा आहे. या सरकारमध्ये कोणताही घटक वंचित राहिला नाही. सर्वांना न्याय दिला जाईल.
दादा भुसे यांचे केले कौतूक
नाशिकमधून अनेक जण आले आहेत. नाशिक जिल्ह्यात दादा भुसे चांगेल काम करीत आहेत. ते पक्ष वाढवण्याचे कामही करत आहेत. ठाण्याप्रमाणे नाशिकमध्ये पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. मी आजही कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहेत आणि हे करताना सर्वांगीण विकास करणारा आहे.
नाशिक जिल्ह्यातून आलेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी लोकांची कामे करीत राहावे. सरकार तुमच्यासोबत असणार आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम आपल्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा.
संजय राऊत यांना आव्हान
तुम्ही आरोप करत आहात तर आरोप सिद्ध करावे. सिद्ध झाले तर आम्ही सन्यास घेतो नाहीतर तुम्ही संन्यास घ्या असं थेट आव्हानच संजय राऊत यांना दादा भुसे यांच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी मालेगावमधील वातावरण चांगलेच तापले आहे.