Navneet Rana Video: ए चला बाहेर, आवाज खाली करा, मुऱ्हाळी झालेल्या मुंबई पोलीसांवर नवनीत राणांची अरेरावी
. आधी वॉरंट दाखवा नंतरच आम्ही तुमच्यासोबत येऊ असं नवनीत राणा म्हणाल्या
मुंबई: महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला जातंय हे दाखवणारा हा आणखी एक प्रसंग. खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (ravi rana) यांनी मुंबईतून माघार घेण्याची घोषणा केली. त्यानंतर मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून चाललेले उपदव्याप बंद होतील आणि लोकांच्या प्रश्नांकडे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही लक्ष देतील अशी अपेक्षा केली जात असतानाच राड्याचा आणखी एक अंक घडला. हा अंक घडला राणा दाम्पत्याच्या घरी. एखाद्यानं माघार घेतल्यानंतर त्याला सन्मानानं पाठवण्याची आपली संस्कृती आहे. पण तो विसर आता सगळीकडेच झालेला दिसतोय. विजयाच्या थाटात काही शिवसेना, नेते, कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यांचं घर गाठलं आणि तिथं घोषणाबाजी सुरु केली. माफी मागण्याची मागणी केली. राऊत, परब अशा नेत्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ‘स्मशानाची’ भाषा केली. अशा स्थितीत सर्वात मोठं संकट उभं राहिलं ते मुंबई पोलीसांसमोर. राणा दाम्पत्य अमरावतीला जाणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्यावर खार पोलीस ठाण्या गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलीस त्यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि अटक नाट्याचा दुसरा अंक सुरू झाला. अटक वॉरंटची मागणी करत नवनीत राणा यांनी खार पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला. (mumbai police) तर बरीच हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्यांना अटक केली. यावेळीही त्यांची घोषणाबाजी सुरू झाली. या दोघांनाही खार पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज मुंबई पोलिसांवर चांगल्या भडकल्या. राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलीस त्यांना घेऊन जाण्यासाठी आले होते. त्यावेळी राणा यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला. आधी वॉरंट दाखवा नंतरच आम्ही तुमच्यासोबत येऊ असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी नवनीत राणा यांचा संतापाचा पारा चढला. ए चला बाहेर. आवाज खाली करा, अशा शब्दात नवनीत राणा पोलिसांवर संतापल्या.
आवाज खाली करा, आवाज खाली करा
तुम्ही आम्हाला घ्यायला आलात. हा कोणता नियम आहे. मी येणार नाही. वॉरंट दिल्याशिवाय हात नाही लावायचा सांगून ठेवते मी. वॉरंट आणा. त्यानंतरच आम्हाला न्या. तुम्ही तुम्ही महिला आहात. तुमचा रिस्पेक्ट करते. तुम्ही येऊ नका. नियमानुसार काम करा. नियमाबाहेर काम करू नका. वॉरंट दाखवा आणि आम्हाला अटक करा. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आवाज खाली करा. आवाज खाली करा. आवाज खाली करा. मी सांगत आहे. तुम्ही आमच्या घरात येऊ शकत नाही, अशा शब्दात नवनीत राणा यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला.
पोलिसांकडून अटक
यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पोलिसांसोबत येण्यास नकार दिला. मात्र, या हाय व्होल्टेज ड्रामानंतर अखेर पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी नवनीत राणा संतापलेल्या होत्या. रवी राणा आणि नवनीत राणांना गाडीत बसवण्यात येत असताना त्यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. ही जुलूमशाही आहे. राज्यात सरकार आहे की नाही? आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना जर अटक केली जात असेल तर सामान्य लोकांचं काय होत असेल?, असा सवाल राणा दाम्पत्याने केला. तर, आधी राऊत आणि अनिल परबांवर गुन्हा दाखल करा मगच आम्हाला अटक करा, असं सांगतानाच आम्हाला अटक का केली जात आहे? आम्ही काय गुन्हा केला, असा सवाल रवी राणा यांनी केला.