मुंबई: हनुमान चालीसावरुन (hanuman chalisa) सुरु झालेल्या राजकारणाचा आणखी एक अंक आता खार पोलीस ठाण्यात घडलाय. तो म्हणजे खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) , शिवसेना नेते संजय राऊत, आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. त्यासोबत 500 ते 600 शिवसैनिकांविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती तक्रार खार पोलीसांनी दाखलही करुन घेतलीय. तसा फोटो खुद्द राणांकडून प्रसारित करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस मुख्यमंत्र्यासह राऊत, परब आणि शिवसैनिकांविरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना भादंवि कलम 153 अ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आता कोर्ट बंद असल्याने उद्या किंवा सोमवारी त्यांना कोर्टात हजर केलं जाऊ शकतं. त्यामुळे या दोघांनाही आजची रात्र खार पोलीस ठाण्यात काढावी लागणार आहे. राणा दाम्पत्यांनी केलेली तक्रार जशीच्या तशी.
दि . 22/04/2022 चे रात्री पासूनच आम्ही खार येथे राहात असलेल्या इमारती समोर शिवसैनिकांची गर्दी जमा झाली . पोलीस बंदोबस्त लावला असतांना सुध्दा त्यांना न जुमानता ते लोक आमचे नावाने शिवीगाळ व धमक्या देत होते. असे असतांना दि . 23/04/2022 रोजी सकाळी आमचे इमारती बाहेरील पोलीस बॅरेगेटीग तोडून ते सर्व लोक आम्हाला जिवाने मारण्याचे उद्देशाने आवारात शिरले . तसेच आमच्या बिल्डींग मध्ये व आमच्या फ्लॅटमध्ये जबरदस्ती येण्याचा प्रयत्न करीत होते .
त्यांचे या कृत्यास गैरअर्जदार क्र . 1 व 2 हे चिथावणी देत होते व त्यांचे सांगण्यावरून तिथं उपस्थित लोक हे आमचे नावाने नारे देवून आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या देत होते . तेथे उपस्थित जमावाच्या हातातील हत्यार सदृष वस्तु बघता त्यांचा उद्देश आम्हाला मारण्याचा असावा यात शंका नाही. आमच्या हनुमान चालीसा म्हणण्याच्या घोषणेनंतर ज्या प्रकारचे माहिती समोर आली आहे, त्यावरून असे लक्षात आले की, काल सायंकाळी मातोश्री इथं मिटींग बोलावून, आजच्या दिवसाबाबत विशेष आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार शेकडो लोकांचा जमावडा मातोश्रीसमोर बोलावून त्यांच्या हातात बॅट, हॉकी व इतर हत्यार सदृष वस्तु देवून आम्हाला मारहाण करून जिवे मारण्यात येईल असे वातावरण तयार करण्यात आलेले आहे.
त्याच वेळी मातोश्री समोर ॲम्ब्युलंस तयार ठेवून व ही ॲम्ब्युलंस राणा दांपत्याकरीता आहे, अशी जाहीर घोषणा तेथील लोकांनी केलेली आहे. शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत यांनी सुध्दा याच दरम्यान ट्विट करून संयम आणि सौजन्याची ऐशीतैशी असे म्हणून तिथे उपस्थितांना हेतुपुरस्सर चिथावणी दिलेली आहे. लोकशाही पध्दतीने व लोकहितार्थ आम्ही हनुमान चालीसा पठन करणार होतो,परंतू असे असतांना मा. मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत , नामदार अनिल परब व इतर नेते मंडळी यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरीता सर्व लोकांना चिथावणी देवून फक्त आम्हाला शारिरीक नुकसान कसे पोहोचविता येईल, तथा आमचे जीविताचे कसे बरे वाईट होईल या करीता चिथावणी दिलेली आहे व त्या अनुषंगाने आमचे मुंबई येथील निवासस्थानी गैरकायदेशिर मंडळी जमवून व तथाकथीत शिवसैनिक पाठवून हे लोक हल्ला घेवून आलेले आहेत व आताही त्या सर्व लोकांनी आमच्या घराला वेढा करून ठेवलेला आहे व आम्ही घराच्या बाहेर निघताच आम्हाला जिवानिशी ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत.
एवढेच नव्हेतर आम्हाला मारहाण केल्यानंतर आम्हाला हॉस्पीटलमध्ये नेण्याकरीता अॅम्ब्युलंस सुध्दा तयार ठेवलेली आहे. यावरून शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे, खासदार संजय राऊत, नामदार अनिल परब हे आमच्या घरासमोर जमलेल्या गैरकायदेशीर असामाजिक तत्वांना आम्हाला जिवानिशी मारण्याकरीता चिथावणी देत आहेत हे स्पष्ट होते. त्यांच्या या कृतीमुळे आमच्या जीवितास धोका आहे. आमच्या जीवितास काही झाल्यास त्याकरीता मा. उध्दव ठाकरे , खासदार संजय राऊत, नामदार अनिल परब हे जबाबदार राहतील.
तरी माझे घरावर हल्ला घेवून आलेल्या सर्व लोकांविरुध्द कायदेशीर कार्यवाई करण्यात यावी. तसेच त्यांना चिथावणी देणाऱ्या वरील सर्व गैरअर्जदारांना आमचा जीव घेण्याचा कट रचल्याचा तसेच त्याकरीता तयारी केल्याचा व बेकायदेशीर मंडळी आमच्या मुंबई येथील घरासमोर आम्हाला जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने जमवून तसेच आमचे घराला वेढा देवून आम्ही घराबाहेर पडल्यास आम्हाला ठार मारण्याची सर्व तयारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच वरील कृत्य करून सर्व गैरअर्जदार जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तरीही वरील सर्व गैरअर्जदार व आमच्या मुंबई येथील घरासमोर जमलेल्या व घराला वेढा घातलेल्या 500 ते 700 तथाकथित शिवसैनिकांवर भां.द.वि. चे कलम 120-ब, 143, 147, 148, 149, 452, 307, 153-अ, 294, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा
करीता ही तक्रार
रवि गंगाधर राणा
नवनित रवि राणा