Navneet Rana : नवनीत राणा रवी राणा यांना आज बेल की जेल, कोठडीत उपचार नीट मिळत नाही, वकिलाची तक्रार
मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट त्यांना चहा देतानाचा व्हिडिओच ट्विटवर टाकला त्यावरही जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. मात्र आजच्या कोर्टातल्या युक्तीवादादरम्यान नवनीत राणा यांच्या वकिलांनी त्यांना कोठडीत योग्य उपचार मिळत नसल्याची नवी तक्रार केली आहे.

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) अनेक दिवसांपासून कोठडी मुक्कामी आहेत. आज त्यांच्या जमीन अर्जावर मुंबईत सुनावणी सुरू आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालीस पठणाचा (Hanuman Chalisa) अट्टाहास नवनीत राणा आणि रवी राणा यांना नडला. देशद्रोहासारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले. सुरुवातील कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची कोठडी सुनावली. सुरूवातील नवनीत राणा यांनी आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी चागली वागणूक दिली नाही अशी तक्रार केली . हे प्रकरण लोकसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचले. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट त्यांना चहा देतानाचा व्हिडिओच ट्विटवर टाकला त्यावरही जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. मात्र आजच्या कोर्टातल्या युक्तीवादादरम्यान नवनीत राणा यांच्या वकिलांनी त्यांना कोठडीत योग्य उपचार मिळत नसल्याची नवी तक्रार केली आहे.
नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास
नवनीत राणा यांच्या वकिलांच्या या नव्या दाव्याने पुन्हा राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. आतापर्यंत यात मुंबई पोलिसांनी अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच पोलीस याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचे ब्लड प्रेशर वाढल्याच्याही चर्चा सुरू होत्या. मात्र प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. आता रिजवान मर्चंट यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे की, नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्यांना सीटी स्कॅनची सुविधा दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्याा या पत्रावर आता जेल प्रशासन काय निर्णय घेतंय? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
फरशीवर झोपण्यास भाग पाडलं
नवनीत राणा यांना खाली फरशीवर बसण्यास आणि झोपण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आलाय. आणि त्यामुळेच हा त्रास वाढल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर नवनीत राणा यांना सीटी स्कॅनचा सल्ला देण्यात आला, मात्र प्रशासनाने परवानगी दिली नाही, असा आरोप त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी केला आहे. जेजे हॉस्पिटलने स्पॉन्डिलोसिस तपासण्यासाठी सीटी स्कॅन आवश्यक असल्याचे लेखी दिले होते. कारागृह प्रशासनाने हे केले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. आज नवनीत राणा यांना जामीन नाही मिळाला तर त्यांचा कोठडी मुक्काम आणखी वाढणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नवनीत राणा यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर भाजप नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उडवली होती.



