आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची मागणी बेदखल, नाना पटोले काय म्हणाले…शरद पवारांची चुप्पी
Shiv Sena ubt Uddhav Thackeray: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांनी मागणी धुडकवून लावली. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार? हे वरिष्ठ नेते ठरवतील, ते तुमचे आमचे काम नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला. त्यामुळे दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांची मागणीची दखलच घेतली गेली नाही.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून यात्रा काढल्या जात आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने महायुती आणि भाजपला लक्ष केले. शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच जाहीर करा, माझ्या त्याला पाठिंबा असल्याचे आवाहन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला व्यासपीठावरुन केला. परंतु उद्धव ठाकरे यांच्या या मागणीची दखल दोन्ही पक्षांकडून घेतली गेली नाही. शरद पवार यांनी या मागणीवर मौन बाळगले तर नाना पटोले यांनी दिल्लीश्वरावर हा विषय टाकला.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शुक्रवारी महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा झाला. या संयुक्त मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आपली मागणी लावून धरली. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीत काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला गेला नाही. त्यामुळे मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आताच उमेदवार जाहीर करा, मी पाठिंबा देतो. उद्धव ठाकरे किंवा इतर कोणाचे नाव जाहीर करा. या ठिकाणी पृथ्वाराज चव्हाण आहेत, शरद पवार आहेत, आताच निर्णय घ्या, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले.
शरद पवार यांचे सूचक मौन
उद्धव ठाकरे यांच्या या मागणीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसादच दिला गेला नाही. शरद पवार यांनी आपल्या संपूर्ण भाषणात या विषयावर मौन बाळगले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत चकार शब्दही काढला नाही. यामुळे सत्ता आल्यास उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यास शरद पवारसुद्धा तयार नाही का? असा प्रश्न चर्चिला जात आहे. कारण महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणूनच शरद पवार यांची ओळख आहे.
काँग्रेसने मागणी धुडकवली
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांनी मागणी धुडकवून लावली. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार? हे वरिष्ठ नेते ठरवतील, ते तुमचे आमचे काम नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला. त्यामुळे दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांची मागणीची दखलच घेतली गेली नाही.
मिलिंद नार्वेकर यांचे पत्र
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाणार नसेल तर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख म्हणून कार्य करु नये, त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यावरच त्यांनी प्रचारप्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी, असे शिवसेना उबाठा आमदार मिलिंद नार्वेकर यांनी शिवसैनिकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त फायदा झाला. त्यामुळे उगीच प्रचार प्रमुखाची माळ आपल्या गळ्यात बांधून त्याचा इतरांना फायदा करून घेऊ नये. या सर्व प्रकरणातून वेगळं राजकारण दिसून येत असल्याचे नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे.