Special Report : महाराष्ट्रातील ‘राज’कारण, मिमिक्री, निशाणा आणि टोले, विरोधकांकडूनही मनसेला प्रत्युत्तर
मोठ्या प्रतीक्षेनंतर राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. मात्र मनसेनं आता भूमिकांचं नवनिर्माण केल्याचा आरोप होतोय.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर विरोधकांनी भूमिका बदलाचा आरोप केलाय. राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट का केल्या नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय. राज्याबाहेर जाणारे प्रकल्प, परप्रांतीयांचा मुद्दा, राज्यपालांची विधानं यावर राज ठाकरेंनी काल भाष्य केलं. मात्र कर्नाटक सीमावाद आणि ‘हर-हर महादेव’ सिनेमाच्या वादावर बोलणं राज ठाकरेंनी टाळलं.
मोठ्या प्रतीक्षेनंतर राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. मात्र मनसेनं आता भूमिकांचं नवनिर्माण केल्याचा आरोप होतोय. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंचा होता.
राज ठाकरेंनी काल सरतेशेवटी देश म्हणजे राज्यांचा समूह असल्याचं मत मांडलं. आणि आरोपांऐवजी राज ठाकरेंनी केंद्र सरकारला फक्त गुजरात-गुजरात न करण्याचा सल्ला दिला.
14 वर्षानंतर यूपी-बिहारच्या लोकांचा पुळका बृजभूषण यांना कसा आला? असा प्रश्न राज ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी केला होता. तोच विषय राज ठाकरेंनी काल पुन्हा छेडला. मनसेचं रेल्वे आंदोलन हे यूपी-बिहार विरोधात नव्हे तर यूपी-बिहारमधून आलेल्या मुलांबद्दल होतं, असं राज ठाकरे म्हटले. विशेष म्हणजे मनसेचं ते आंदोलन उत्तर प्रदेशविरोधात नव्हे तर बिहारींविरोधातच होतं, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
बेळगावच्या सीमावादाबद्दल मनसेची भूमिका आधीपासून स्पष्ट आहे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मईंनी सोलापूर आणि अक्कलकोटवर दावा सांगितला. त्याबद्दल राज ठाकरे बोलले नाहीत. याआधी राज ठाकरेंनी स्वतंत्र विदर्भाला तीव्र विरोध केला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणीचं आवाहन केलं.
राज्यपालांच्या ज्या विधानावरुन राज्यात गदारोळ सुरुय, ज्यावरुन मनसेच्या नेत्यांनीही निषेध नोंदवला, त्यावरुन राज ठाकरेंनी थेट बोलणं टाळलं. राज्यपालांवर टीका केली. मात्र त्याला संदर्भ राज्यपालांनी ४ महिन्यांपूर्वी केलेल्या एका दुसऱ्या विधानाचा होता.
याआधी ईडी चौकशी आणि समान नागरी कायद्यावरुनही मनसेवर भूमिका बदलाचे आरोप झाले आहेत. राज ठाकरेंनी काल ‘हर-हर महादेव’ सिनेमावरुन झालेल्या वादावरही बोलणं टाळलं. या वादात मनसेचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एकमेकांसमोर आले होते. ज्या सिनेमाचं खुद्द राज ठाकरेंनी कौतुक केलं, आणि स्वतःच्या आवाजात निवेदनही दिलं. त्या वादावर राज ठाकरेंनी बोलणं टाळलं.
इतिहासावरुन राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे कायम आमने-सामने येते. कधीकाळी राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी पुरंदरेंचा सन्मान कसा केला होता? असा प्रश्न मनसे विचारते. तर मराठे-मुघलांमधली लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती, असं मानणाऱ्या मनसेला राष्ट्रवादीकडून प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचा दाखले दिले जातात. शिवकाळात भगव्या विरुद्ध हिरव्या झेंड्यातली लढाई दिसली नाही का? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला होता.
तूर्तास, सत्तेत इतक्या वेगानं बदल होतायत. त्यावर मी काय बोलायचं? असं म्हणत राज ठाकरेंनी एकदा मिश्किलपणे उत्तर दिलं होतं.