NCP | ‘राष्ट्रवादीत फूट नाही’, आता नेमकी कोणती राजकीय खेळी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटांमधील संघर्ष निवडणूक आयोगात जावून पोहोचला आहे. येत्या 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात याप्रकरणी प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी दोन्ही गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केल्यानंतर, निवडणूक आयोगात आता 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मात्र त्याआधी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या वक्तव्यांनी ट्विस्ट आलाय. अजित पवारांचा गट सत्तेत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गट विरोधात आहे. तरीही राष्ट्रवादीत फूटच पडलेली नाही, असं दोन्ही गट म्हणतायत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतायत, पक्षात फूट पडलेली नाही आणि अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळही म्हणतायत की फूट पडलेली नाही.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणतायत पक्षात फूट पडलेली नाही. मग राष्ट्रवादीत नेमकं झालंय काय? अर्थात, कायदेशीर बाजू मजबूत राहावी म्हणून जयंतराव असतील की भुजबळ, दोन्ही नेत्यांनी गुगली टाकण्याचा प्रयत्न केलाय. निवडणूक आयोगात 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादीवर पहिली सुनावणी होणार आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट, या दोन्ही गटाला आयोगानं नोटीस बजावलीय. म्हणजे राष्ट्रवादी कोणाची आणि घड्याळ चिन्हं कोणाला मिळणार? यावर दोन्ही बाजूनं युक्तिवाद होणार आहे.
जयंत पाटील यांचा निवडणूक आयोगावर आरोप
मात्र सुनावणीआधीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आयोगावर शंका उपस्थित केलीय. पक्षात फूट पडलेली नाही. त्यानंतर बोलण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती शरद पवारांनी केली. तरीही फूट पडल्याचं निश्चित करुन निवडणूक आयोगानं सुनावणी ठेवली, असा आरोप जयंत पाटलांनी केला.
याआधी शरद पवारांनीही वारंवार सांगितलंय की, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. तर आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळा निर्णय घेतला, आणि त्याची तक्रार विधानसभेच्या अध्यक्षांकडे केलेली आहे. तर पवारांसोबतचेच मित्रपक्षाचे सहकारी संजय राऊत म्हणतायत की, राष्ट्रवादीत फूट तर पडलेली आहे. फूट पडलेली नाही असं कसं म्हणता? असा उलट प्रश्न राऊतांनी केलाय.
राष्ट्रवादीच्या एकूण 53 आमदारांपैकी 40 हून अधिक आमदार आपल्यासोबत आहेत, असा दावा अजित पवारांचा आहे. तसेच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षही मीच आहे, हेही अजित पवार सांगतायत. दुसरीकडे जयंत पाटलांनी भाजपला चिमटा काढलाय. फोडफोडी करणाऱ्यांना गणपती बाप्पा सुबुद्धी देवो, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तर बाप्पा तुम्हालाच सुबुद्धी देईल म्हणजे पुन्हा ते असं बोलणार नाही, असा टोला फडणवीसांनी लगावलाय.