पवारांना प्रश्न केला वाझे प्रकरणाबद्दल तर ते काय म्हणाले? देशाच्या राजकारणावर बोलले पण वाझेवर?
सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटाकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे | Sharad Pawar Sachin Waze
बारामती: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे मोघम वक्तव्य शरद पवार यांनी केले. (NCP Supremo Sharad Pawar on Sachin Waze arrest by NIA)
ते रविवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटाकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.
काही दिवसांपूर्वीच मनसुख हिरेन प्रकरणावरुन अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. हिरेन मनसुख प्रकरणात गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन त्यांनी नापसंती दर्शविली होती.
ठाकरे सरकारकडून हे संपूर्ण प्रकरण ज्या ढिसाळपणे हाताळले गेले आहे त्यामुळे शरद पवार प्रचंड व्यथित झाले आहेत. शिवसेनेशी संबंधित असलेल्या सचिन वाझे यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेच्या आग्रहामुळेच सचिन वाझे यांना पोलीस दलाच्या सेवेत पुन्हा सामावून घेण्यात आले होते. मात्र, आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणातील आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभागृहात विरोधकांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला बसत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाही सभागृहात फिरकले नाहीत. या सगळ्यामुळे शरद पवार प्रचंड व्यथित होते.
शरद पवार पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
शरद पवार यांनी संपूर्ण पत्रकारपरिषदेत केवळ राष्ट्रीय स्तरावरील विषयांवर बोलणे पसंत केले. त्यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य केले. तामिळनाडू आणि तिथली आजची परिस्थिती आणि लोकांचा कल स्टॅलिन यांच्याबाजूने आहे. त्यामुळे तेच सूत्रे हाती घेतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
तर पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. एक भगिनी राज्यात संघर्ष करत आहे तिला त्रास देण्याचं काम सुरू आहे. बंगाली संस्कृती आणि बंगाली लोकांवर आघात करण्याचा प्रयत्न केला तर सर्व राज्य एकत्र येते. कोणी काही म्हटलं तरी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाततच सरकार बनेल याबाबत माझ्या मनात शंका नाही, असा दावाही शरद पवार यांनी केला.
आसाममध्ये भाजपची स्थिती तुलनात्मक दृष्टया चांगली आहे. म्हणजे एका ठिकाणी भाजपची सत्ता येईल. इतर राज्यात भाजपचा पराभव होणार आहे . हा ट्रेंड आहे. त्यामुळे देशाचं राजकारण बदलेलं, असं भाकीत शरद पवार यांनी वर्तविले.
12 सदस्यांच्या नियुक्तीवर पवारांची प्रतिक्रिया
राज्यपालांची जबाबदारी असते घटनेनं राज्य सरकार आणि मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत. त्यानुसार शिफारस झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे राज्यपालांचं काम असतं. पण शिफारस न पाळण्याचा महाराष्ट्रात चमत्कार पाहायला मिळत आहे. मोदी यांनी मुख्यमंत्री असताना अनेकदा राज्यपाल असताना त्यांनी राज्यपालांच्या तक्रारी केल्या होत्या. पण आता मोदींच्या राज्यात महाराष्ट्रातील राज्यपालांबद्दल केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
संबंधित बातम्या:
सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप
(NCP Supremo Sharad Pawar on Sachin Waze arrest by NIA)