शरद पवार यांचं छगन भुजबळ यांच्याबद्दल सर्वात मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या त्या वक्तव्यावरुन शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर आता शरद पवार यांची भूमिका समोर आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन केलं, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची दोन दिवसांपूर्वी रविवारी बीडमध्ये जाहीर सभा पार पडली होती. या सभेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
तेलगी प्रकरणावरुन शरद पवार यांनी आपला राजीनामा घेतला. पण आपणच तेलगी विरोधात कारवाई केली होती, असं भुजबळ म्हणाले. भुजबळ यांच्या या वक्तव्यार शरद पवार यांनी आजच्या बैठकीत उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. “तेव्हा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ तुरुंगात गेले असते”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीत शरद पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं. “संभ्रम ठेवू नका, लढायला तयार राहा”, असंदेखील शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच “माझ्यावर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे लक्ष देऊ नका”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. “मी लढण्यासाठी तयार आहे. तुम्हीदेखील लढायला तयार राहा. ही विचारांची लढाई आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढाईची आहे. संभ्रम ठेवू नका, असं शरद पवार बैठकीत म्हणाले आहेत. लोकशक्ती ही आपल्याच मागे आहे”, असंही पवार या बैठकीत म्हणाले.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?
“साहेब, मला एक कळलं नाही, तुम्ही 23 डिसेंबर 2003 ला माझा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. मी गृहमंत्री होतो. प्रफुल्ल पटेल तिथे होते. त्यांना बोलावण्यात आलं. तेलगी प्रकरण होतं. त्याला मी अटक केलं. त्याच्यावर मोक्का लावायला लावला. कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले. साहेब, तुम्ही मला बोलावलं आणि सांगितलं की, भुजबळ तुम्ही राजीनामा द्या”, असं छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले होते.