महाराष्ट्रात कट्टर विरोधक, पण नागालँडमध्ये एकसोबत, नेमकं कारण काय? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
राजकारणात कधी काय होईल? याचा भरोसा नाही, असं म्हणतात. नागालँडमध्ये सध्या तेच बघायला मिळालं. कारण नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेच्या सात जागांवर विजय मिळवूनही भाजप आघाडीला पाठिंबा दिलाय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने नागालँडमध्ये भाजपच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागालँडमध्ये नुकतंच विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपला 12 जागांवर यश मिळालं. एनडीपीपी पक्षाला 25 जागांवर यश मिळालं. या निकालानंतर एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल सात उमेदवारांचा विजय झाला. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी बाकावर न बसता सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
“नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 विधानसभा सदस्य निवडून आले आहे. निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठींबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांना आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही युती केलेली नाही. आमची अंडरस्टँडिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “नागालँड राज्याचे एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारचा स्थैर येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे, पण भाजप म्हणून नाही”, असंदेखील पवार यावेळी म्हणाले.
“मला आश्चर्य वाटतं मेघालय आणि शेजारच्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकींच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही गेले होते. नरेंद्र मोदी यांनी मेघालयाच्या प्रचारादरम्यान राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. त्यांचा पराभव करा असं सांगितलं. आणि निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासोबत सहभागी झाले”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांवर शरद पवारांची प्रतिक्रिया
दरम्यान, महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारता असता ते म्हणाले, या संदर्भात मला माहित नाही. तुम्ही या ठिकाणचे नेत्यांना विचारा. पण राष्ट्रीय लेव्हलला अशी बैठक घ्यायची आमची चर्चा सुरू आहे. तुम्ही इतर लोकांना विचारा, पण राष्ट्रीय पातळीवर अशी एक बैठक घ्यायची आमची चर्चा सुरु आहे. दोन दिवसांनी संसदेचं अधिवेशन सुरु होईल. दोन दिवसानंतर या संदर्भात आमच्या नेत्यांची ही चर्चा करणार आहे