सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होणार? शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीवर अजित पवार नाराज आहेत का? तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकीच कुणीतरी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली. याशिवाय शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. या मोठ्या घोषणेनंतर शरद पवार यांनी आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीवर अजित पवार नाराज आहेत का? तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकीच कुणीतरी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “नाही, नाही. राष्ट्रवादी अध्यक्षपदाची जागा अजून खाली झालेली नाही. ही जागा खाली झाल्यावर विचार केला जाईल”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
“जयंत पाटील हे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. अजित पवार हे महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर आज महाराष्ट्रात महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुळे यांची निवड करण्यामागील कारण म्हणजे त्यांच्यावर अशी कोणतीही मोठी जबाबदारी नव्हती. याशिवाय त्यांची जबाबादारी घेण्याची तयारी होती. त्यामुळे कोण खूश आणि कोण खूश नाही ही गोष्ट एकदम चुकीचा आहे. ज्याची निवड झाली त्यांचं नाव सिनियर लोकांनी गेल्या एक महिन्यांपासून घेतलं होतं. त्याचा निर्णय आज झालाय”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले?
“दोन गोष्ट आहेत. या देशाची रचना पाहिल्यानंतर, तीन, चार, पाच जे महत्त्वाची राज्य आहेत, सर्व राज्याची जबाबदारी एका व्यक्तीवर दिली तर आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही विविध सहकाऱ्यांना जबाबदारी देवून कामं वाटून घेतले आहेत जेणेकरुन आम्ही आगामी लोकसभे निवडणुकीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
“दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची निवड केली गेली त्यांच्याबाबत लोकांची मागणी होती की, त्यांना जबाबदारी देण्यात यावी. त्याचा विचार करुन जबाबदारी देण्यात आली आहे. एक मागणी होती किंवा माझं स्वत:चं मत होतं की आता इतरांच्या हाती जबाबदारी सोपवावी. पण इतर पक्षांनी राजीनाम्याला विरोध केला. अन्य सहकारी मला विविध राज्यांसाठी काम करतील तर मला मदत होईल”, असंही शरद पवार यांनी सांगितलं.