भाजपसोबत जाण्याबाबत शरद पवार अजित पवार गटाच्या आमदारांना म्हणाले….
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या गटाच्या आमदार आणि मंत्र्यांनी आज पुन्हा शरद पवार यांची भेट घेतलीय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या घडामोडींदरम्यान शरद पवार यांची नेमकी भूमिका काय आहे? याबाबतची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक मंत्री आणि काही नेत्यांनी कालदेखील शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे जावून भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांनी आज पुन्हा वाय. बी. चव्हाण सेंटर येथे जावून शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटाने पक्ष एकसंघ राहावा यासाठी योग्य निर्णय घेण्याची विनंती शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर शरद पवार यांनी काय भूमिका मांडली? याबाबतची माहिती आता समोर येत आहे.
अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांना आपल्यासोबत सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली. पण शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपसोबत जायचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी सत्ताधारी गटाकडे मांडली. तसेच लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही, असं शरद पवार यांनी अजित पवार गटाला ठणकावून सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
45 मिनिटं बैठक, पण शरद पवार भूमिकेवर ठाम
शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात आज 45 मिनिटे बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी अधिकृतपणे भाजपसोबत यावं, अशी विनंती करण्यात आली. पण शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडत भाजपसोबत जाणार नसल्याचं म्हटलं. शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता आगामी काळात काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
व्हीप कुणाचा लागू होणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर विधी मंडळाचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सध्याच्या राजकीय घडामोडींमधील अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आहे. ठाकरे गटाने दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर व्हीप नेमका कोणता गटाचा खरा, याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात.
16 अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष निकाल देण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटात व्हीप नेमका कुणाचा लागू होणार? याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तरी दोन्ही गटाचे प्रतोद मानले जातील.