मुंबई | 28 जानेवारी 2024 : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम ठोकला आहे. नितीशकुमार यांनी सर्वात आधी आरजेडीशी असलेली आघाडी तोडली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नंतर त्यांनी भाजपशी युती करून थेट बिहारमध्ये नवं सरकार स्थापन केलं. नितीशकुमार यांनी आजच राजीनामा दिला आणि आजच मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. नितीशकुमार यांच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नितीशकुमार यांच्या या दलबदलू भूमिकेवर सर्वच स्तरातून टीका होत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना नितीशकुमार यांचा दलबदलू म्हणत त्यांच्या भूमिकेचा एका वाक्यात निकाल लावला आहे. कमी दिवसात अश्या पद्धतीने सरकार बदलणे अशी स्थिती या पूर्वी कधी पाहायला मिळाली नाही. दोन तीन महिन्यापूर्वी नितीश कुमार यांनी विरोधकांची एकजूट व्हावी यासाठी पाटणा येथे बैठक बोलावली होती. विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे या भूमिकेवर मागच्या 15 दिवसापूर्वी ते काम करत होते. अचानक काय झाले मला माहीत नाही? आता त्यांनी भाजपा सोबत जाऊन सरकार बनवले आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
याच्या आधी सरकार बनवल्यानंतर इतका वेळा कोणी बदल केला असे पाहायला मिळाले नाही. नितीश कुमार यांनी सरकार बदलण्याचे आणि बनवण्याचे रेकॉर्ड केले आहे. अशा पद्धतीची परिस्थिती यापूर्वी कधीही झाली नाही. ती नितीशकुमार यांच्यामुळे पुढे आली आहे. याच्या आधी हरियाणाचे नाव देशापुढे होतं. हरियाणामध्ये आयाराम गयाराम ही फेज पाहायला मिळत होती. हरियाणाच्या आयाराम गयाराम यांच्या पेक्षा देखील आता जास्त वेळा नितीशकुमार यांनी बाहेर पडणं स्वीकारलं आहे, अशी टीका करतानाच आता यावर बोलणं योग्य नाही. ज्यावेळेस मतदानाची वेळ येईल त्यावेळेस लोक मतदानाच्या माध्यमातून करारा जवाब देतील, असा सूचक इशाराही शरद पवार यांनी दिला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे. इंडिया आघाडीत त्यांचं नाव कधीच आघाडीवर नव्हतं ही चुकीची माहिती आहे. भाजपने सांगितलं होतं की, नितीश कुमार हात जोडत जरी आमच्या दारात आले तरी आम्ही सोबत जाणार नाही. आणि हेच नितीश कुमार यांनी देखील सांगितलं होतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे. राजकीय फायद्यासाठी नितीश कुमार इकडे तिकडे जात असतात. पण गेल्या 2014 पासून देशात आणि आपल्या राज्यात देखील अस्थिर राजकरण केले जात आहे. राजकीय नितीमत्तेला मातीमोल करण्याचं काम भाजपा करत आहे. आपल्या राज्यात देखील लोकांना विकत घेउन भ्रष्ट सरकार स्थापण्यात आलं आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.