मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं विधान केलं होतं. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. निदर्शने केली जात आहेत. राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारले जात आहेत. तसेच राज्यपालांच्या या विधानाचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचे संकेतही विरोधकांकडून दिले गेले आहेत. त्यामुळे राज्यपालांची मोठी कोंडी झाली आहे. मात्र, आपल्या त्या विधानावरून राज्यपाल बॅकफूटवर आल्याचं समजतं. त्यांनी त्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचं वृत्त आहे.
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील तीन पुस्तके भेट दिली. यावेळी राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानावरून राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असल्याचं या शिष्टमंडळाने राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर माझ्याकडून चूक झाली. मी दिलगिरी व्यक्त करतो, असं राज्यपाल कोश्यारी म्हणाले, असा दावा प्रशांत जगताप यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व्यवस्थित वाचल्याशिवाय त्यांना महाराज कळणार नाहीत. त्यामुळेच आम्ही राज्यपालांना तीन पुस्तके दिली आहेत. मात्र, त्यांनी अजूनही वारंवार महाराजांचा अपमान केला तर आम्ही गप्प बसणार नाही.
राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी एवढ्याने चालणार नाही. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी जगताप यांनी केली.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठीत दीक्षांत समारंभ होता. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हटलं होतं.
तसेच शिवाजी महाराजांची केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तुलना केली होती. त्यावरून राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीच या प्रकरणात लक्ष घालण्याचं घालण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर महाराष्ट्र बंदचे संकेत दिले होते. तर खासदार उदयनराजे भोसले हे या घटनेचा निषेध करताना पत्रकार परिषदेत भावूक झाले होते. तसेच त्यांनी उद्या रायगडावर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे या आत्मक्लेस आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.