Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांचा वांद्रे पश्चिम मतदारसंघ कसा बनला भाजपाचा बालेकिल्ला?

Baba Siddique : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर निर्घृण हत्या झाली. 35 वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी पक्ष बदल केला होता. वांद्रे ही बाबा सिद्दीकी यांची कर्मभूमी. बाबा सिद्दीकी यांनी वांद्र्यामधून दोनवेळा नगरसेवक सलग तीनवेळा आमदारकीची निवडणूक जिंकली. बाबा सिद्दीकी ज्या वांद्रे पश्चिममधून आमदार झाले, तो मतदारसंघ आता भाजापाचा बालेकिल्ला बनलाय. हे कसं शक्य झालं, ते जाणून घ्या.

Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांचा वांद्रे पश्चिम मतदारसंघ कसा बनला भाजपाचा बालेकिल्ला?
Baba SiddiqueImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 11:54 AM

दोन दिवसांपूर्वी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी एका घटनेने सगळ्या मुंबापुरीला हादरवून सोडलं. असं काही घडेल, असं स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं. सगळीकडे दसऱ्याचा उत्साह होता. लोक एकमेंकाना दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. फटाक्यांची आतषबाजी चाललेली. देवीच्या विसर्जना मिरवणुका निघालेल्या. शनिवार रात्रीचे 9 वाजलेले. सगळीकडे वातावरणात उत्साह होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी वांद्रे पूर्वेला असलेल्या आपल्या निर्मल नगर कार्यालयातून बाहेर पडलेले. त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या राम मंदिराजवळ एक ऑटोरिक्षा आली. तीन जण त्यातून उतरले. ओळख लपवण्यासाठी तिघांनी आपले चेहरे कपड्याने झाकलेले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेली बंदुक बाहेर काढली व समोर उभ्या असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्यावर धडाधड तीन गोळ्या झाडल्या. बाबा सिद्दीकी तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आरोपींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी देवीची विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्यामुळे गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही. आरोपींनी त्या स्थितीचा फायदा उचलला. हा सगळा प्रकार रात्री 9.15 ते 9.30 दरम्यान घडला. बाबा सिद्दीकी यांना लगेच जवळच्या लिलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. पण तो पर्यंत उशिरा झालेला. बाबा सिद्दीकी यांच्या ह्दयाचे ठोके थांबलेले. एका लोकप्रिय नेत्याने जगाचा निरोप घेतलेला. एखाद्या चित्रपटात घडावी तशी घटना प्रत्यक्षात घडलेली.

बाबा सिद्दीकी यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघाच प्रतिनिधीत्व केलेलं. पण वांद्रे पश्चिम हा 2009 साली पुनर्रचनेनंतर तयार झालेला मतदारसंघ आहे. त्याआधी वांद्रे विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. वांद्रे पूर्व-पश्चिम असे आता दोन मतदारसंघ असले, तरी वांद्रे हीच बाबा सिद्दीकी यांची कर्मभूमी, ओळख होती. बाबा सिद्दीकी यांचा राजकीय उत्तराधिकारी असलेला त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी सध्या वांद्रे पूर्वमधून आमदार आहे.

म्हणून वांद्र्याच्या निवडणुकीची नेहमी चर्चा

बाबा सिद्दीकी ज्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, त्याचा राजकीय इतिहास जाणून घेऊया. पण त्याआधी वांद्रयाची मतदारसंघ रचना कशी होती, ते समजून घ्या. 2008 साली मतदारसंघ पुनर्रचनेआधी वांद्रे विधानसभा हा एकच मतदारसंघ होता. हा मतदारसंघ मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. पहिल्यापासून हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. खासकरुन काँग्रेसचे दिवंगत नेते सुनील दत्त यांचा या मतदारसंघात विशेष दबदबा होता. सुनील दत्त यांनी तब्बल पाचवेळा उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक जिंकली. मुंबईच्या या मतदारसंघातून काँग्रेसला नेहमीच भरभरुन मतदान झालं. काँग्रेसचे आमदार, नगरसेवक सतत या भागातून निवडून आले. खासकरुन वांद्रयाबद्दल बोलायच झाल्यास उच्चभ्रू मतदारांच्या जोडीने झोपडपट्टीधारक मतदारही या भागात मोठ्या प्रमाणात आहेत. शाहरुख खान, सलमान खान असे बॉलिवूडचे मोठे स्टारही वांद्रयात राहतात. त्यामुळे लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा वांद्र्याची निवडणूक नेहमीच चर्चेत राहिली. बाबा सिद्दीकींच्या वांद्रे पश्चिममध्ये आता आमदार कोण?

आता वांद्रे पश्चिम मतदारसंघाबद्दल जाणून घेऊया. 1990 साली मुंबईचे दोन जिल्हे तयार करण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगर. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात 10 मुंबई शहरात तर 26 उपनगरात आहेत. 2008 साली लोकसंख्येच्या प्रमाणानुसार देशातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहरात 10 आणि उपनगरात 26 विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. बाबा सिद्दीकी यांचा वांद्रे पश्चिम उपनगरात येणारा मतदारसंघ आहे. 177 क्रमांकाच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आमदार आहेत.

2009 च्या पराभवाचा वचपा काढला

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार यांनी लोकप्रिय आमदार काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा पराभव केला व पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. ही निवडणूक जिंकताना आशिष शेलार यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांच्याकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला. त्यांनी सलग तीन टर्मपासून आमदार राहिलेल्या बाबा सिद्दीकी यांचा तब्बल 26,911 मतांनी पराभव केला. त्यावर्षी शिवसेना-भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. आशिष शेलार यांच्यासमोर शिवसेनेच्या विलास चावरी यांचा सुद्धा निभाव लागू शकला नव्हता. 2014 पासून वांद्रे पश्चिममधून आशिष शेलारच आमदार आहेत. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत आशिष शेलार यांनी काँग्रेसच्या असिफ झाकारीया यांचा पराभव केला. यावेळी शिवसेना-भाजपा युती होती.

पक्षउमेदवाराचे नाव एकूण मतं टक्केवारी
काँग्रेसबाबा सिद्दीकी (विजयी)59,659 46.52
भाजपाआशिष शेलार (पराभूत)57,96845.20

वांद्रे पश्चिममध्ये कुठल्या मतदारांची संख्या जास्त?

असिफ झाकारीया यांनी वांद्रे पश्चिमेच्या वॉर्ड नंबर 101 मधून तीनवेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली होती. पण आशिष शेलार यांच्यासमोर त्यांचं काही चाललं नाही. दुसऱ्यांदा सुद्धा आशिष शेलार यांनी 26 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघांबद्दल बोलायच झाल्यास या मतदारसंघाची एकूण लोकसंख्या 3 लाख 6 हजार 653 आहे. यात मुस्लिम मतदार सर्वात जास्त आहेत.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या 77 हजार 583 आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण 25.3 टक्के आहे.

वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाची रचना लक्षात घेतली, तर मुस्लिम, ख्रिश्नच, पंजाबी आणि सिंधी जास्त आहेत. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणं लिंकिंग रोड, हिल रोड, बँड्रा बँडस्टँड, कार्टर रोड, बँड्रा रेक्लेमेशन, जॉग्स पार्क याच मतदारसंघात येतात.

अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 2014 साली आशिष शेलार यांनी बाबा सिद्दीकीना हरवल्यापासून या मतदारसंघावर भाजपाची पकड मजबूत झाली. मुंबईत शेवटची महापालिका निवडणूक 2017 साली झालेली. या निवडणुकीत वांद्रे पश्चिममधून निवडणून येणाऱ्या भाजपा नगरसेवकांची संख्या वाढली. अल्पसंख्यांक मतदारांची संख्या जास्त असलेल्या या मतदारसंघात भाजपाने आपली पाळमुळं विस्तारायला, घट्ट करायला सुरुवात केल्याचे हे संकेत आहेत.

पक्षउमेदवाराचे नावएकूण मतं टक्केवारी
भाजपा आशिष शेलार (विजयी)74,779 50.93
काँग्रेस बाबा सिद्दीकी (पराभूत)47,86832.60

बाबा सिद्दीकी यांचा पराभव का झाला?

1999 पासून लोकसभा आणि विधानसभेवर सतत काँग्रेस उमेदवांरानाच पाठवणाऱ्या वांद्रे पश्चिममध्ये 2014 साली मतदानाचा पॅटर्न कसा बदलला? ते जाणून घेऊया. “2014 साली देशात मोदी लाट आणि प्रस्थापित सरकार विरोधात लाट होतीच. त्याचा फायदा आशिष शेलार यांना झाला. पण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघात अनेक नवीन काम हाती घेतली. ती काम पूर्ण होतील, यामध्ये स्वत: जातीने लक्ष घातलं. लोकांना आज जमिनीवर बदल पहायचे असतो” असं पाली हिल रहिवाशी असोशिएशनचे सचिव मधु पोपलाई यांनी सांगितलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत TOI शी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं होतं.

आशिष शेलार यांचा दुसऱ्यांदा विजय कशामुळे झाला?

“ख्रिश्चन आणि मुस्लिम हे काँग्रेसचे पारंपारिक मतदार. पण वेळेबरोबर लोकांच्या हे लक्षात आलं की, विधानसभा आणि महापालिकेला पक्षापेक्षा उमेदवार कोण? हे जास्त महत्त्वाच असतं. त्यामुळे परिसराच्या भल्यासाठी कोण चांगलं काम करु शकतो त्या आधारावर लोकांनी मतदान केलं” असं सामाजिक कार्यकर्ते अनिल जोसेफ यांनी सांगितलं. रस्त्याचं विस्तारीकरण, लिंकिंग रोड आणि हिल रोडवरुन बेकायद फेरीवाल्यांना हटवणं, भाभा हॉस्पिटलचा विस्तार, बँड्रा रेक्लेमेशनच सौंदर्यीकरण अशी अनेक काम आशिष शेलार यांनी मार्गी लावली. त्यामुळे मुस्लिम, ख्रिश्चन मतदारांच प्राबल्य असूनही या भागातून आज भाजपाचे आमदार, नगरसेवक निवडून येत आहेत.

पक्षउमेदवाराचे नावएकूण मतं टक्केवारी
भाजपा आशिष शेलार (विजयी)74,816 57.11
काँग्रेस असिफ झाकारीया (पराभूत)48,30936.88

लोकसभेच्या निकालानुसार वांद्रे पश्चिममध्ये कोणाकडे आघाडी?

काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ आता उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाचे उमेदवार प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांचा पराभव केला. मागच्या दोन टर्मपासून उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन खासदार होत्या. त्यांनी दोन्हीवेळा प्रिया दत्त यांचा पराभव केलेला. पण यावेळी भाजपाने त्यांचं तिकीट कापून उज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली. वर्षा गायकवाड यांनी 16,154 मतांनी विजय मिळवला. अत्यंत अटी-तटीची ही निवडणूक झाली. उज्वल निकम यांनी 50 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती. पण वर्षा गायकवाड यांनी ही आघाडी मोडली. वर्षा गायकवाड यांना 49 टक्के तर उज्वल निकम यांना 47 टक्के मत मिळाली. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कुर्ला, चांदीवली, विलेपार्ले आणि कलिना हे मतदारसंघ येतात. त्यात वांद्रे पूर्व, कुर्ला, चांदिवली, कलिना या चार मतदारसंघात वर्षा गायकवाड यांना आघाडी मिळाली. तर विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिममध्ये उज्वल निकम यांनी आघाडी घेतली. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिममध्ये वर्षा गायकवाड यांना 69,347 तर उज्वल निकम यांना 72,953 मतं मिळाली. म्हणजे जवळपास 3 हजार मतांची आघाडी. ही आशिष शेलार यांच्यासाठी चांगली बाब आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.