‘मंत्रिमंडळातच एकमत नाही, मंत्री जाहीरपणे टोकाची भूमिका मांडतात’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. या सर्व घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.
मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसी नेत्यांचा मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध आहे. मंत्रिमंडळातही या मुद्द्यावर चर्चा होत आहे. पण काही मंत्री या मुद्द्यावरुन रोखठोक भूमिका मांडत आहे. याच मुद्द्याचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. “मंत्रिमंडळामध्ये काही लोकं एक बाजू धरतात तर काही लोकं दुसरी बाजू धरतात. मंत्रिमंडळातच आरक्षणाच्या विषयी एकमत नाही. टोकाचे मतभेद आहेत. मंत्रीच जाहीरपणाने टोकाची भूमिका व्यक्त करत असतील तर मुख्यमंत्र्यांचं या सरकारवर नियंत्रण आहे की नाही?”, असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केलाय.
“कुणावरही लगाम नसल्यामुळे या सरकारला दिशाहिनता आलेली दिसत आहे. नागरिकांना सरकार एका दिशेने जाताना दिसत नाहीय. सरकारचा ज्यावेळी ऱ्हास सुरु होतो तेव्हा पहिल्यांदा मंत्रिमंडळात एकमत नाही, असं दिसतं”, असं मोठं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. “मंत्रिमंडळात निधी वाटपावरुन मतभेद आहेत. आरक्षणावरुन सरकारमध्ये मतभेद आहेत. विकासकामे घेण्यावरुन सरकारमध्ये मतभेद आहेत. या सर्व गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
‘मला तो अधिकार नाही’
जयंत पाटील यांना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “शरद पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कुणाला भेटावं किंवा कुणाला भेटू नाही, या विषयी बोलण्याचा मला कोणाताही अधिकार नाही. त्याविषयी मी भाष्य करणंही अपेक्षित नाहीय. तो त्यांच्या कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर भाष्य करु इच्छूक नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.
अजित पवार गट नाराज?
यावेळी जयंत पाटील यांच्या नाराजीबाबतदेखील प्रश्न विचारण्यात आला. “अजित दादा राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यांच्या गटाने तक्रार करणं असं काही कारण असेल, असं मला वाटत नाही. पण त्यांनाच माहिती नेमका तपशील काय? अजित पवार राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांना निधी मिळणार नाही, असं होणार नाही. पण त्यांना शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्यातून निधी मिळत नसेल तो त्यांच्या सरकार अंतर्गत प्रश्न आहे. किती आमदारांना किती निधी दिला जातो हा चुकीचा पायंडा सध्या पाडला जातोय. राज्याच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला आणि कोणता क्षेत्रात झाला, याचं महत्त्व आता कमी झालंय”, असं जयंत पाटील म्हणाले.