Jitendra Awhad Emotional | जितेंद्र आव्हाड भर पत्रकार परिषदेत अक्षरश: ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
केंद्रीय निवडणूक आयोगात नुकतंच राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावर सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी अजित पवार गटाने शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार पक्षात मनमानीपणे वागतात, ते पक्षांतर्गत निवडणुका घेत नाहीत, असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला.
मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या मुद्द्यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात काल पहिली प्रत्यक्ष सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात आला. यावेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार पक्षात मनमानी करतात. ते परस्पर स्वाक्षरी करुन पक्षात पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करतात. पक्षात निवडणुका घेऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व्हायला हवी. पण पक्षात पक्षांतर्गत निवडणूका झाल्या नाहीत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला.
अजित पवार गटाकडून यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवण्यात आला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधी त्यांची नियुक्ती झाली, असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला. याशिवाय आमच्याकडे बहुमत आहे, आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे पक्षावर आमचाच दावा आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला. यासाठी अजित पवार गटाने शिवसेनेच्या निकालाचा दाखला दिला. कालच्या या सुनावणीला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखीव उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर
जितेंद्र आव्हाड यांनी कालच्या सुनावणीवर भूमिका मांडण्यासाठी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना अक्षरश: रडू कोसळलं. ते भर पत्रकार परिषदेत भावून झालेले आणि रडताना बघायला मिळाले. त्यांना अश्रू अनावर झाले होते. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्यावर निवडणूक आयोगात करण्यात आलेल्या युक्तिवादाने जितेंद्र आव्हाड व्यथित झाले आहेत.
“काल निवडणुक आयोगात माझ्या डोळ्यात अश्रू आले. शरद पवार हे संस्थानिकासारखे पक्ष चालवायचे, ते लोकशाही पद्धतीने वागले नाहीत. त्यांनी हुकूमशाह असं विधान केल्याने मी व्यथित झालो. कालपर्यंत जे विठ्ठल बोलत होते ते हुकुमशाह बोलू लागले”, असं बोलत असताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले.
‘इतकं असंवेदशील होणं हे…’
“मला त्या वकिलाचं बोलणं ऐकून वाटलं की, आपण कशासाठी लढतोय? कुठली नीती, कुठली मुल्य? घरात बसल्यानंतर तुम्हाला फोन येणार की तुम्हाला मंत्री केलंय, जा शपथविधी करा, त्यांच्या या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याच्या त्यांना काय फळ मिळालं? तर ते हुकूमशाह आहेत? मला महाराष्ट्रातील एका व्यक्तीने हे सांगावं की शरद पवार हुकूमशाह सारखे वागतात. त्यांनी पक्षात लोकशाही ठेवली नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“एवढंच होतं तर तुम्ही शरद पवार यांना सोडून जायचं होतं आणि सांगायचं होतं की, साहेब तुम्ही लोकशाहीवादी नाही आहात. आम्हाला तुमच्या पक्षात राहायचं नाहीय. आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो, आणि स्वतंत्र चालतो. त्यांच्या हातातून पक्ष घेण्याचा प्रयत्न करत आहात. तोपर्यंत ठीक आहे. समजू शकतो राजकारण आहे. पण काल वकिलांमार्फत जे बोलण्यात आलं ते सहन न होणारं होतं. इतकं असंवेदशील होणं हे ज्यांनी त्यांच्याकडून सर्व घेतलं त्यांना शोभत नाही”, असं आव्हाड म्हणाले.