निखिल चव्हाण, Tv9 मराठी, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुण्यात दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजप पक्ष आक्रमक झालाय. जितेंद्र आव्हाड यांनी आपले शब्द मागे घ्यावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येतंय. भाजपच्या या भूमिकेवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी “त्यांनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पाच लोकांच्या साहाय्याने संपवलं. हे त्यांना सांगायचं नाहीय”, असं विधान केलं. “शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची महानता या लोकांना कधी सांगायची नाही. संभाजी महाराज व सुलतान अकबर यांच्यातला इतिहास यांना सांगायचा नाहीय”, असं देखील जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
“हे आंदोलन भाजपने केलेलं होतं. या आंदोलनासाठी फक्त त्यांची 40 लोकं होती. पण आमची 400 – 500 लोकांची फौज तयार होते. पोलिसांकडून काळजी घेण्यात आली होती”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
“भाजप त्यालाच घाबरलेला आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून झाला. याच्यानंतर बहुजन आवाज बाहेर आल्यानंतर त्यांना आग लागलेली आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
“मी माझ्या वाक्याचा संदर्भासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे. याबाबत पौराणिक संदर्भ सांगायचा झाला तर, महिषासुर वर्दिनीच्या पायाखाली महिषासुर होता. त्याचा वध केला म्हणून देवीला महिषासुर वर्दिनी नाव पडले आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“मी कधीही माझ्या वाक्यावर सरवासारव करत नाही. मी संपूर्णपणे विचारांती बोलत असतो. ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला वजाबाकी करता येत नाही”, असं आव्हाड म्हणाले.
“उद्या अंदमान आणि निकोबार यामधील अंदमान काढून टाकलं तर सावरकर यांच्याबद्दल काय सांगणार? हे सावरकरांचा इतिहास सांगू शकतात का?”, असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले.
“हिटलर आणि मुसोलिनी होता त्यामुळे दुसरे महायुद्ध झाले तर यामधील संदर्भ काढला तर काय सांगणार?”, असा सवाल त्यांनी केला.
“अकबर आणि महाराणा प्रताप यामधील युद्धात अकबर जर काढला तर महाराणा प्रताप यांच्या बद्दल शौर्य कसं सांगणार?”, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“या लोकांनी जे महापुरुषांचे अपमान केलेला आहेत त्यावर पांघरून घालण्यासाठी हे संपूर्णपणे करत आहेत. भाजपकडून आपण उत्तर देऊ शकत नाही. त्यासाठी हे संपूर्णपणे वळवण्याचा प्रकार आहे”, असा दावा त्यांनी केला.
“मी जे बोललो ते बोललो त्याचा संदर्भ दिलेला आहे. वैयक्तिक माघार घेणार नाही. अनेक आंदोलनं होऊ दे राष्ट्रवादीकडून प्रतिउत्तर हे दिले जाणार”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
“सत्ताधाऱ्यांपुढे महत्त्व होतील असं कधीच चित्र होत नाही. आणि अशी चित्र जर घडवत असतील तर तसे होणार नाही”, असं आव्हाडांनी स्पष्ट केलं.
“हे लोक माझं एक वाक्य दाखवत आहे. माझं संपूर्ण भाषण हे लोक दाखवणार का?”, असा सवाल त्यांनी केला.
“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृति का झाली? हे भाजपाच्या नेत्यांनी सांगावं. हे भाजपचे नेते हे सांगू शकतात का?”, असाही सवाल त्यांनी केला.
“त्यांनी या संपूर्ण गोष्टींचा संदर्भासह स्पष्टीकरण द्यावं. त्यांना माझं चॅलेंज आहे. मनुस्मृती हेच संविधान आहे हे असं कोण बोललेलं आणि का बोललेलं आहे? त्याचं स्पष्टीकरण भाजपने द्यावं”, असं आव्हान आव्हाडांनी दिलं.
“मी घाबरणारा माणूस नाही. मी माझं विधान कधीच मागे घेणार नाही. माझ्याबद्दल जीभ कापा आणि बक्षीस मिळवा असं बोलत आहेत. हे जे बोललेले आहे त्यांचं बघूया भविष्यात काय होतं”, असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलं.
“मी जे बोललो आहे त्याच्यावरती मी माघार घेणार नाही. मी बोललेल्या वाक्यावर ठाम आहे. एवढा मोठा बलाढ्य शक्तीला संपवून टाकून शिवाजी महाराज हे महान होते आणि महानच आहेत. परंतु हे लोक सांगणार नाही यांना इतिहासाचा विद्रुपीकरण करायचा आहे”, असं आव्हाड म्हणाले.
“हिंदू जन आक्रोश मोर्चा काढत आहेत. काय गरज आहे? तुमच्याकडे सरकार आहे लगेच कायदा आणू शकतात. पण ते तसं करणार नाही. रस्त्यावर उतरून अल्पसंख्यांक यांच्यामध्ये कशाप्रकारे भीती आणता येईल हेच ते पाहत असतात”, अशी टीका त्यांनी केली.
“या देशात शांतता नांदू नये ह्याच गोष्टी भाजप करत आहे. भाजपच्या डोक्यामध्ये विकृती आहे. हे मानसिक वृत्ती आहे आणि विकृती आहे”, असं ते म्हणाले.
“तुमच्याकडे आमदारांची संख्या आहे. येथे अधिवेशनामध्ये कायदा पारित करा. फक्त कायदा करायचा नाही या लोकांना वेडं बनवायचं हेच ध्येय भाजप आहे”, अशीदेखील टीका त्यांनी केली.