नवाब मलिक यांच्या दोन्ही मुली शरद पवार यांच्यासमोर अक्षरश: ढसाढसा रडल्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपण पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्या पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्या राजीनाम्याला विरोध होतोय. शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आह
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज त्यांच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या लोक माझ्या संगती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या शेवटच्या वेळी शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यांच्या या घोषणेमुळे संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हादरला. सगळ्यांना धक्का बसला. हे अनपेक्षित होतं. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यांना रडू कोसळलं.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी आपण राजीनामा देतो पण तुम्ही राजीनामा देऊ नका, अशी विनंती केली. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. तसेच शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण अन्नत्याग करुन आंदोलन करु, अशी घोषणा त्यांनी केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या दोन्ही मुली देखील आल्या होत्या. मलिक यांचं कुटुंब सध्या अनेक अडचणीतून जात आहे. नवाब मलिक यांना जामीन मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहेत. पण शरद पवार यांनी अचानक राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नवाब मलिक यांच्या दोन्ही मुलींना रडू कोसळलं.
नवाब मलिक यांच्या मुली नेमकं काय म्हणाल्या?
“नमस्ते सरजी, पवार साहेब, आपण सगळ्यांचं ऐकलं, आमचंही ऐका. आम्ही नवाब मलिक यांच्या दोन मुली आलो आहोत. आपल्याला विनंती करायला आलो आहोत की, आमच्या वडिलांच्या गैरहजेरीत आपण आमचे वडिलांसारखे आहात. आपण कृपया करुन आपला निर्णय मागे घ्या आणि आमच्यासोबत आपण जसे उभे आहात तसेच उभे राहा”, असं नवाब मलिक यांच्या मुली रडत रडत म्हणाल्या.
“आपला हा एक निर्णय आमच्यासाठी या घडीला चांगला ठरणार नाही. तुम्ही आम्हाला खूप साथ दिली आहे. आपण आजही आमच्यासोबत उभे राहा आणि आम्हाला साथ द्यावं, अशी आमची इच्छा आहे”, अशी भावना नवाब मलिक यांच्या मुलीने व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ : (संबंधित व्हिडीओत 1 तास 6 व्या मिनिटाला मलिकांच्या दोन्ही मुली रडत रडत आपली भूमिका मांडताना दिसत आहेत)
शरद पवार राजीनामा घोषित करताना नेमकं काय म्हणाले?
“प्रदीर्घ कालावधीनंतर कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला कदाचित अस्वस्थ वाटेल. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतलेला आहे”, अशी घोषणा शरद पवार यांनी आज कार्यक्रमात केली.