काल शरद पवार यांची साथ, आज थेट अजित पवार यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला हजर राहिलेले आमदार आता अजित पवार यांच्या भेटीला जात आहेत. विशेष म्हणजे राजेश टोपे हे देखील आज अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील काही दिग्गज आमदारांनी आज अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचादेखील समावेश आहे. शरद पवार यांच्या गटातील आमदार सुनील भुसारा आणि आमदार राजेश टोपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान या दोन्ही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
शरद पवार यांनी काल वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलावलेल्या बैठकीमध्ये आमदार सुनील भुसारा आणि आमदार राजेश टोपे उपस्थित होते. पण त्यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी पक्षामधील बहुसंख्या आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील तब्बल 40 हून अधिक आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
चेतन तुपे अजित पवार गटात?
विशेष म्हणजे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनीदेखील अजित पवारांची भेट घेतली आहे. चेतन तुपेंनी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे चेतन तुपे हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले का? असा प्रश्न उपस्थित होतोय. तुपे हे देखील काल शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित होते. चेतन तुपे यांनी अजित पवार यांची ‘देवगिरी’ बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीची लढाई आता निवडणूक आयोगात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. एका बाजूला शरद पवार तर दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत. सध्या तरी अजित पवार यांचं पारडं जड दिसत आहे. पण तरीही राजकारणात काय होईल, याचा भरोसा नाही. शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा आपला निवडणूक आयोगावर विश्वास आहे, असं मत शरद पवार यांनी दिलं. तसेच यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातही जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे आता आगामी काळात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.