VIDEO: देशमुखांपासून फडणवीसांपर्यंत आणि मावळपासून लखीमपूरपर्यंत; शरद पवारांची 7 मोठी विधाने
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील भाजप नेत्यांपासून ते केंद्रसरकारवर जोरदार हल्ला चढवला. (ncp leader sharad pawar address media, know 7 key points)
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील भाजप नेत्यांपासून ते केंद्रसरकारवर जोरदार हल्ला चढवला. पवारांनी यावेळी 1 तास 2 मिनिटे आणि 43 सेकंद संवाद साधला. पवार कुटुंबीयांच्या घरावर पडलेल्या धाडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी शरद पवार यांनी अनिल देशमुखांपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंतच्या मुद्द्यावर आणि मावळपासून ते उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील हिंसेवर भाष्य करत भाजपला धारेवर धरले.
देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी कुठे आहेत?
केंद्र सरकार काही यंत्रणांचा गैरवापर करत आहे. सीबीाय इन्कम टॅक्स, ईडी असेल एनसीबी या सर्व एजन्सीचा वापर राजकीय दृष्टीने केला जात आहे. त्यात काही उदाहरण द्यायचंच तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री. अनिल देशमुखांवर त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. मला येऊन भेटले होते. त्यांनी आरोप केले. त्यातून जे वातावरण झालं त्यामुळे देशमुखांना राजीनामा दिला. ज्यांनी आरोप केला ते कुठे आहे ते माहीत नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार माणसावर बेछुटपणे आरोप करतो हे पूर्वी कधी घडलं नव्हतं. देशमुखांनी बाजूला व्हायची भूमिका घेतली. आता आरोप करणाऱ्यावर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. देशमुख बाजूला झाले आणि हे गृहस्थ गायब झाले आहेत. देशमुखांची चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा मारला. त्याच घरात पाचवेळा जाऊन छापा मारण्याचा विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. पाच पाचवेळा एखाद्या व्यक्तीच्या घरी जाणं कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही पवाारांनी सांगितलं.
अजीर्ण होईल इतका पाहुणाचार घेऊ नये
पाहुणे हा शब्द वापरला हे चांगलं केलं. हा शब्द मी कॉईन केला होता. मी बोलेल पण त्यांची चौकशी झाल्यावर बोलेल. वस्तुस्थिती सांगेल. ती चौकशी सुरू आहे. केंद्रातील काही अधिकाऱ्यांकडून काही माहिती घेतली. पाहुणे येतात. अनेक ठिकाणी येतात. एक दिवस असतात, दोन दिवस असतात, तीन दिवस असतात, आजचा सहावा दिवस आहे. पाहुणाचार घ्यावा, पण अजीर्ण होईल इतका पाहुणाचार असू नये, असं पवार म्हणाले.
माझ्या घरातील मुलींची त्यांनी आठवण केली. या तिन्ही मुलींचा कारखाना नाही. एक पब्लिकेशनमध्ये आहे. एक डॉक्टर आहे. तिसरी गृहिणी आहे. त्यांचा या सर्वांशी संबंध नाही. ठिक आहे तिकडे गेले चौकशी केली. एक दीड दिवसात चौकशी केली. त्यांनाही जायची घाई होती. पण त्यांनाही सारखे फोन येत होते. थांबा म्हणून सांगितलं जात होतं. अजून घर सोडू नका. आमच्या मुलींनी विचारलं, दोन दिवस झाले… तीन दिवस झाले… तुमच्या घरचे वाट पाहत असतील. त्यांनी सांगितलं आम्हाला जायचंय, पण आम्हाला सूचना आहेत की आम्ही सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. त्यामुळे पाच दिवस झाल्यावर काहीजणांनी घर सोडले. आज सहाव्या दिवशीही दोन तीन ठिकाणी पाहुणे आहेत, असं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
यावेळी त्यांनी लखमीपूर घटनेवरही भाष्य केलं. काही प्रकार देशात घडले. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांवर हल्ला झाला. लखीमपूरच्या संदर्भात सरळसरळ माहिती आली. मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेतकऱ्यांच्या जमावावर काही लोक गाडीतून येतात आणि त्यांना चिरडतात. त्यात तीन ते चार लोकांची हत्या होते. त्यात एक पत्रकारही त्यात होता. असा प्रकार कधी घडला नव्हता. असा प्रकार घडल्यानंतर त्या शेतकऱ्यांपैकी काही लोकांनी सांगितलं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे चिरंजीव होते. पण ते नाकारले गेले. त्यावर कारवाई करावी अशी मागणी झाली. पण यूपी सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही. सहा सात दिवसानंतर सर्वोच्च न्यायालायने प्रतिक्रिया दि्लयानंतर गृहराज्य मंत्र्याच्या मुलाला अटक होते. मुलाचा संबंध नसल्याचं हेच गृहराज्यमंत्री सांगत होते. त्यांच्या चिरंजीवाला त्यांच्या पक्षाचं सरकारलाच अटक करावी लागली. कारण त्याच्या बद्दलचे पुरावे सापडले. त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
सत्तेत असल्याचं स्मरण राहणं कधीही चांगलं
पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, असं सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.
मावळवरून फडणवीसांना कानपिचक्या
मावळमधील गोळीबाराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काही भाष्य केलं. मावळमध्ये काय घडलं हे त्यांनी सांगितलं हे बरं झालं. त्यावेळी कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. मावळमध्ये जे झालं. शेतकरी मृत्यूमुखी पडले. त्याला राजकीय पक्षाचे सत्ताधारी जबाबदार नव्हते. नेतेही जबाबदार नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने हे प्रकर घडलं. फडणवीसांनी मावळ आणि लखीमपूरची तुलना केली. मावळच्या शेतकऱ्यांचा नाराजी सत्ताधाऱ्यांवर होती. पण नंतर यात सत्ताधाऱ्यांचा संबंध नसल्याचं मावळच्या लोकांच्या लक्षात आलं. तर परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रोत्साहित केलं. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली, असं मावळच्या लोकांना आज वाटतंय. मावळची वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली आहे, असं त्यांनी सांगितलं.
त्याच मावळमध्ये भडकवण्याचं काम कोणी केलं हे मावळच्या जनतेच्या लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके 90 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या वर्षांनी राष्ट्रवादीची जागा आली नसती. माजी मुख्यमंत्र्यांनी मावळचं उदाहरण काढलं हे बरं झालं. त्यांनी मावळची मानसिकता जाणून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
भाजप नेत्यांनी खुलासा करण्याचं कंत्राट घेतलं का?
आम्ही सत्तेचा उन्माद कधी दाखवला नाही. नवाब मलिक यांनी एका व्यक्तीबाबत काही मते मांडली. एका अधिकाऱ्याबाबत त्यांनी सांगितलं. मी केंद्रातील एका अधिकाऱ्याकडून माहिती घेण्याचं काम केलं. दोन एजन्सी आहेत. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीायचा गैरवापर सातत्याने सुरू आहे. केंद्राच्या एजन्सीने रिकव्हरी केली. कुणाच्या खिशात पुडी सापडली आणि कुणाच्या खिशात काही सापडले. मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाने जे पकडलं त्याचं प्रमाण केंद्राच्या एजन्सीपेक्षा अधिक होतं. राज्याची एजन्सी दिलेलं काम प्रामाणिकपणे करते. तर मुंबईची एजन्सी हे केवळ सराकरला दाखवण्यासाठी करत असल्याचं अशी शंका असते.
केपी गोसावी पंच होते. काही गुन्हा घडला तर पंचनामा होतो. सर्व माहिती लिहितात. पंचाच्या समोर सर्व लिहिलं जातं. ही साधारण पद्धत आहे. अधिकारी जे काही अॅक्शन घेतात ती योग्य आहे याची खात्री वाटावी म्हणून असे लोक पंच म्हणून घेतात. पण गोसावी फरार आहेत. पंच म्हणून ज्याची निवड केली तो समोर येत नाही. पोलिसांच्या समोर येत नाही. याचा अर्थ त्यांचं कॅरेक्टर संशयास्पद दिसतं. मात्र अधिकाऱ्याने या व्यक्तीाल पंच म्हणून निवड केली याचा अर्थ या अधिकाऱ्याचं असोसिएशन अशा माणसासोबत आहे हे दिसून येतं.
भाजपचे नेते त्यावर खुलासा करायला सर्वात आधी येतात. भाजप नेत्यांनी कधी कंत्राट घेतलं हे कळलं नाही. राज्यातील एका केंद्रीय राज्यमंत्र्यानं विधान केलं आहे. आम्हीच धाड मारल्याचं या नेत्यानं म्हटलं. ते आमचं काम आहे, असं ते म्हणाले. त्यांनी आमच्या ज्ञानात भर टाकली. ते भेटल्यावर त्यांचं अभिनंदन करेल, असा चिमटा पवारांनी काढला.
चीनच्या मुद्द्यावर केंद्राच्यासोबत
यावेळी त्यांनी भारत-चीनमधील तणावावरही भाष्य केलं. मला तुम्हाला काही प्रश्नांनावर बोलायचं आहे. देशाच्या सीमेबाबत मी थोडाबहुत अभ्यास केला आहे. आपला चीनसोबत डायलॉग सुरू आहे. त्याची चर्चा अयशस्वी झाली आहे. एका बाजूला चीनशी डायलॉग अयशस्वी होतोय. दोन्ही बाजूने हा डॉयलॉग अयशस्वी झाला आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे काही प्रतिक्रिया ऐकायला मिळतेय. पुंछमध्ये आपले पाच जवान शहीद झाले. हे सतत घडतंय ते चिंताजनक आहे. दिल्लीतील आमच्या अन्य पक्षाच्या सहकाऱ्यांशी बोलतोय. केंद्राशीही बोलत आहे. एकत्र बसून सर्वांनी सामुहिक भूमिका घेण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.
महिन्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी ए.के. अँथोनी आणि मला बोलावून आम्हाला चीनवर काय चाललं याचं ब्रिफिंग दिलं. त्यातून आम्ही एका गोष्टीचा निष्कर्ष काढला. राजकीय प्रश्नावर आपला संघर्ष होऊ शकतो. पण या प्रश्नावर आपण मतभेद आणि राजकारण न आणता संरक्षण खात्याशी आम्ही सहमत असू. संरक्षण खातं जी काही भूमिका घेईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ. कालच्या प्रकाराने पुन्हा एकदा एकत्र बसण्याची वेळ आली आहे. दिल्लीत गेल्यावर काही सहकाऱ्यांशी चर्चा करू. काही लोकांशी फोनवर बोललो. देशातील जनतेला सतर्क करणार आहोत. अर्थात चिंतेचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
तपास यंत्रणेकडून देशमुखांच्या घरी पाचवेळा छापा मारण्याचा विक्रम, शरद पवारांचा घणाघाती हल्ला
फडणवीसांकडून मावळ गोळीबाराची आठवण, आता पवारांनी मावळातील वस्तुस्थितीच माडंली!
(ncp leader sharad pawar address media, know 7 key points)