मुंबई : महाराष्ट्रात आगामी काळात अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. कारण आगामी काळात राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजण्याची दाट शक्यता आहे. तर पुढच्याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक असणार आहे. या सर्व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. आगामी निवडणुका या महाविकास आघाडीसाठी जास्त महत्त्वाची असणार आहेत. कारण राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर घडून आलं आहे. विशेष म्हणजे त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षातीन ज्येष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केल्यानंतर पवारांनी पुन्हा राजीनामा मागे घेतला. त्यानंतर आता पक्ष आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखत आहे. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर एकच सूर होता. तर एका मुद्द्यावरुन शरद पवार यांनी आपल्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या, अशी माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीत एकत्र राहूनच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवाव्यात, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा होता. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून काही नेते राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा आहे. या चर्चांवरुन शरद पवार यांनी आजच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार यांनी यावेळी महाविकास आघाडी भक्कम ठेवा. लोकसभा-विधानसभा एकत्रच लढावयाच्या आहेत, अशा सूचना केल्या.
महाविकास आघाडीतच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवायची. कर्नाटकमध्ये जो ट्रेण्ड आहे तो महाराष्ट्रात आहे. भाजप नको. त्यांची सत्ता येऊ नये, असा मतदारांनी कौल दिला आहे. जनमत भाजप विरोधात आहे. जो पक्ष भाजपबरोबर गेला त्यांना कर्नाटकमध्ये मतादारांनी मत दिले नाही. तसेच महाराष्ट्रात चित्र आहे, अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी दोन क्रमांकवर आहे त्याची जबाबदारी विभागानुसार नेत्यांना दिली, अशी देखील माहिती समोर आलीय.