बंदला विरोध करणाऱ्या मनसेचा लखीमपूर हत्येला पाठिंबा आहे का?; नवाब मलिक यांचा सवाल
लखीमपूर हिंसेच्या विरोधात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला मनसेने विरोध केला आहे. मनसेच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. (nawab malik)
मुंबई: लखीमपूर हिंसेच्या विरोधात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला मनसेने विरोध केला आहे. मनसेच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या बंदला मनसेने विरोध केला आहे. मग मनसेचा लखीपूरमधील हत्येला पाठिंबा आहे का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने आज बंदच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकात निदर्शने केली. यावेळी नवाब मलिकही उपस्थित होते. या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मलिक यांनी लखीमपूरच्या हिंसेवरून मनसेला धारेवर धरले. लखीमपूर येथील शेतकरी हत्येला भाजपचा पाठिंबा आहेच शिवाय मनसेचेही शेतकऱ्यांच्या हत्येला समर्थन आहे म्हणजे मविआने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का?, असा सवाल मलिक यांनी केला.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून मारले होते. त्यांना अटक करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला आहे शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचा दावा करतानाच मलिक यांनी सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानले आहेत.
शांततेत आंदोलन करा
विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही. शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे, असे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.
कामगार संघटनाही आंदोलनात
कामगार संघटनाही आंदोलनात उतरल्या आहेत. बंदही यशस्वी झाला आहे. बंदला काही भाजपच्या व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. मात्र, त्या बोटावर मोजण्या एवढ्या आहेत. त्यांचा विरोध आहे. मोठ्या संघटनांचा बंदला पाठिंबा आहे. व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे बंद यशस्वी झाला आहे. बंद पुकारल्यानंतर लोक स्वत: समोर येऊन पाठिंबा देत आहेत. त्यामुळे बंद यशस्वी झाला आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
ही तर सत्तेची मस्ती
यावेळी सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. लखीमपूरच्या हिंसेच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांना चिरडले जाते हे दुर्देव आहे. माणुसकी राहिली नाही. पूर्वी राजकारणात माणुसकी होती. केंद्राने ही माणुसकी संपवली आहे. शेतकऱ्यांचा खून केला आहे. त्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चिरडण्यात येत असल्याचा व्हिडीओ पाहिला. त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारला आहे. ही सत्तेची मस्ती आहे. तुम्ही तो व्हिडीओ बघा. यात माणुसकी दिसते. ही क्रूरता आहे. उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत चुकीची आहे, असं सांगतानाच नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रातील मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 11 October 2021 https://t.co/JiV975Anuo #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021
संबंधित बातम्या:
आम्ही काय करून दाखवू शकतो हे दाखवण्यासाठीच आजचा बंद: प्रणिती शिंदे
(NCP minister Nawab Malik slams mns over maharashtra bandh)