‘तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं’, खडसेंचा मुख्यमंत्र्यांसोबत भावनिक संवाद
आपल्या आयुष्यात सर्वात लक्षात राहील, असा कोणता प्रसंग असू शकतो? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. पण एकनाथ खडसे यांना हा प्रश्न विचारला तर ते कदाचित गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत घडलेल्या घडामोडींविषयी सांगू शकतील. खडसे गेल्या आठवड्यात एका खूप मोठ्या संकटातून बचावले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. पण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ते बचावले. या कठीण काळात खडसेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोलाची मदत केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आभार मानत असताना खडसे भावूक झाले.
मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना गेल्या आठवड्यात हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांच्या हृदयाशी जोडलेल्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाला होता. पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे त्यांचा जीव बचावला. त्यांना या संकट काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी मदत केली. एकनाथ शिंदे यांनी खडसेंना जळगावहून मुंबईला उपचारासाठी हलवण्यासाठी युद्ध पातळीवर एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे खडसेंना मोठी मदत झाली. त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेल्या या मदतीने एकनाथ खडसे भारावले आहेत. त्यांनी अतिशय भावनिकपणे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांच्या फोनवरील संभाषणाचा व्हिडीओदेखील आता समोर आला आहे.
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भावनिक संवाद साधला. “तुमचं विमान वेळेवर टेकऑफ झालं नसतं तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं”, असं एकनाथ खडसे शिंदेंसोबत संवाद साधत असताना म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खडसेंनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं. वेळीच एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल खडसेंनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत. एकनाथ खडसेंवर नुकतंच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
खडसेंनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर घटनाक्रम सांगितला
“मला एअर अँम्ब्युलन्स मिळत नव्हती. म्हणजे इथून मिळाली मला. नाशिकला उभीपण होती. त्याबाबत क्लियर माहिती मिळत नव्हती. तुम्ही बोलल्यामुळे ती लवकर मिळाली. मला हॉस्पिटलला आणण्यानंतर ऑपरेशन थिएटरला नेलं, माझ्यावर अँजोप्लास्टी करत असताना दोन ब्लॉक शंभर टक्के होते. तिसरा ब्लॉक 70 टक्के होता. त्यांनी दोन ब्लॉकचं ऑपरेशन केलं”, अशी माहिती खडसेंनी मुख्यमंत्र्यांना फोनवर दिली.
“चांगलं ऑपरेशन झालं. मी या स्ट्रेचरवरुव त्या स्ट्रेचरवर गेलो. दरम्यान, एक कार्डीओटिक अरेस्ट आला. माझं हृदय बंद पडलं. त्यावेळी सर्व यंत्रणांनी प्रयत्न केले. डॉक्टरांनी प्रयत्न केले. त्यानंतर पुन्हा हृदय सुरु झालं. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेकऑफ झालं असतं तर लँड झालंच नसतं. मदत करणारा मोठा असतो. समय समय की बात हैं. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा! थँक्यू”, असं एकनाथ खडसे फोनवर म्हणाले.