शरद पवार यांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची धमकी?; बारामतीत काय सुरुय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. बारामतीत शरद पवार यांची बाजू घेणाऱ्यांना थेट नोकरीवरुन काढलं जात आहे, त्यांच्यासोबत दादागिरी केली जात आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
मुंबई | 18 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत धक्कादायक दावा केला आहे. शरद पवार यांच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरुन काढण्याचा आणि दादागिरी करण्याचा प्रकार केला जात असल्याचा मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय संघर्ष आगामी काळात जास्त तीव्र होण्याचे संकेत मिळत आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत हा संघर्ष जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटाकडून बारामती लोकसभेचा उमेदवार निश्चित झालाय. शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. असं असताना रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार यांनी नेमका आरोप काय केला?
“अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मीडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गँग करतेय. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगनेही लक्षात ठेवावं”, अशा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मिडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 18, 2024
राष्ट्रवादीच्या गोटात आगामी काळात काय-काय घडणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही महिन्यांपूर्वी अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे पक्षात मोठी फूट पडली. पक्षात दोन गट पडण्याआधी अजित पवार हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याची गेल्याची चर्चा सुरु होती. पण अजित पवारांनी त्या चर्चांचं खंडन केलं होतं. याउलट त्यांनी अनेकवेळा भाजपवर टीका केली. असं असताना त्यांनी सत्ताधारी पक्षांसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर अजित पवार यांचा स्वत:चे काका शरद पवार यांच्यासोबत राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाला आगामी काळात काय यश मिळतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलाय. त्यांनी अजित पवार यांच्या गटाला पक्ष बहाल केलाय. तसेच निवडणूक आयोगानेही तसा निर्णय घेतला आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर लोकसभा निवडणूक जाहीर झाली की, राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतात का? ते पाहण देखील महत्त्वाचं ठरणार आहे.