साहेब, राजीनामा मागे घ्या… कुणाचं चिंचेच्या झाडावर चढून आंदोलन, तर कुणी लिहिलं रक्ताने पत्र; तीन दिवसानंतरही आंदोलन सुरूच

| Updated on: May 05, 2023 | 8:26 AM

शरद पवार यांच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निर्णय घेईल, असे चित्र आजच्या बैठकीत उभे केले जाईल. त्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी आग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांना हायसं वाटेल आणि नव्या नेतृत्त्वालाही संधी मिळेल, असे बोललं जातंय.

साहेब, राजीनामा मागे घ्या... कुणाचं चिंचेच्या झाडावर चढून आंदोलन, तर कुणी लिहिलं रक्ताने पत्र; तीन दिवसानंतरही आंदोलन सुरूच
Sharad Pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्याला आज तीन दिवस झाले आहेत. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून कार्यकर्त्यांचं रोज आंदोलन सुरू आहे. पण शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमाचीली अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणसमोर येऊन आंदोलन करत पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे. एका कार्यकर्त्याने तर धाराशीवमध्ये चक्क झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन केलं. दुसऱ्या कार्यकर्त्याने रक्ताने पत्र लिहिलं आहे. तर ठाण्यात मोठमोठे बॅनर्स लागले आहेत. साहेबांशिवाय पर्यायच नाही, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे.

TV9 Marathi Live | Maharashtra Politics | NCP Sharad Pawar Resign | Ajit Pawar | CM Eknath Shinde |

धाराशीव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकरी बळवंत थिटे यांनी शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. फक्त स्वतःच्या घरातील लोकांशी चर्चा करून पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पक्षातील कोणाशीही चर्चा केली नाही. त्यामुळे पवार यांची ही कृती आमच्या पचनी पडलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, असं सांगत बलवंत थिटे यांनी आपल्या शेतातील चिंचेवर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केलं आहे.

हे सुद्धा वाचा

लोकांची गर्दी वाढली

शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्याने यापूर्वी शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत म्हणून 1993 ते 2014 या काळात आपली दाढी वाढवून शरद पवार यांचे पंतप्रधान पदासाठी समर्थन केले होते. बलवंत थिटे यांनी आता केलेल्या अनोख्या सत्याग्रहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. तसेच थिटे यांचं हे सरकार पाहण्यासाठी गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात येताना दिसत आहेत.

तरुणाने लिहिलं रक्ताने पत्र….

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. उर्वेश साळुंखे असे या युवकाचे नाव आहे. त्याने शरद पवारांना राजीनाम्याच्या निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. साहेब आपण युवकांसाठी प्रेरणास्थान आहात. बाप आपल्या जबाबदारीतून कधी निवृत्त होत नसतो, असा उल्लेख या युवकाने आपल्या पत्रातून केलाय.

80 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आवाहन केल्यावरही राजीनामा सत्र सुरूच आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 80 पदाधिकाऱ्यांना पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यातील राष्ट्रवादी तालुका अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. सर्व राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी दिली.

सुप्रिया सुळेच अध्यक्ष?

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे जाणे जवळजवळ निश्चित झाले आहे. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या संबंधित कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. याच बैठकीत शरद पवार यांना पक्षाचे एकमेव सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून नेमले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत शरद पवार यांची जागा कोण चालवणार हे निश्चित होण्याची शक्यता आहे.