निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होताच शरद पवार गटाची मोठी घोषणा
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज अजित पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालानंतर शरद पवार गटाने मोठी घोषणा केली आहे.
मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नवी घोषणा जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निकालानंतर नवी मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार असं मोहीमेचं नाव आहे. शरद पवार गटाकडून या नव्या मोहीमेची माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे. नुकतंच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह म्हणजे शरद पवार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शरद पवार यांनी शुन्यातून पक्ष उभा केला. शुन्यातून स्वत:चं आयुष्य उभं केलं. त्यांचं कुणीही काका, मामा, वडील राजकारणात नव्हते. त्यांनी स्वत: सुरु केलेला हा पक्ष आहे. ते पक्षाचे फाऊंडर मेंबर असूनही शुन्यातून सुरु केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. पण मला त्याचं काही आश्चर्य वाटत नाही. सुप्रीम कोर्टाची आधीची ऑर्डर वाचली असेल तर आमदारांच्या आकडेवारीवरुन पक्ष ठरत नाही तर संघटना ठरवते. संघटना ही शरद पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे या ऑर्डर विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार गटाकडून जुना व्हिडीओ ट्विट
शरद पवार गटाकडून शरद पवार यांचा जुना व्हिडीओदेखील ट्विट करण्यात आला आहे. जोपर्यंत लोकांची साथ आहे, तोपर्यंत थकणार नाही, असं शरद पवार या व्हिडीओ बोलताना दिसत आहेत. थकणार नाही, झुकणार नाही, असंदेखील या व्हिडीओत म्हटलं आहे. “२०२२च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत”, असं राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडीओसोबत म्हटलं आहे.
२०२२च्या व्हिडिओत साहेबांचं जे म्हणणं आहे ते आजही तंतोतंत तसंच आहे. कारण, त्यानंतर अनेक राजकीय वादळं आली तरीही हा मनुष्य खचत नाही, साहेबांची इच्छाशक्ती अजूनही प्रचंड आहे. कोणत्याही संकटाला ते आजही निधड्या छातीने सामोरं जातात, म्हणूनच ते आमचे साहेब आहेत!!#sharadpawar… pic.twitter.com/agB3W4nROh
— NCP (@NCPspeaks) February 6, 2024
शरद पवार गटाकडे आता पुढचा पर्याय काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शरद पवार गटाला न्याय मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. शिवसेनेची जशा घडामोडी घडल्या अगदी तशाच घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडताना दिसत आहेत.