जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांची गळाभेट, विधान भवनच्या कॉरिडॉरमध्ये गप्पा रंगल्या, चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांची आज विधान भवनात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेत मस्त गप्पा मारल्या. त्यांच्या भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई | 24 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय सुरुय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतोय. कारण एकाच पक्षाचे दोन गट सत्तेत आणि विरोधात सहभागी होतात. विशेष म्हणजे दोन्ही गटाचे दोन मोठे नेते विधान भवनात एकमेकांना भेटतात. ते एकमेकांशी अतिशय मनमोकळेपणाने आणि हसत-खेळत गप्पा मारतात. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. खरं नेमकं काय आहे? तेच कळायला मार्ग नाही, अशी चर्चा आता सध्या सर्वत्र सुरु आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज भेट झाली. विधान भवनाच्या कॉरिडॉरमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये छान गप्पाही रंगताना दिसल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची भेट आणि त्यांचे गप्पा मारत असतानाचे क्षण कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाले आहेत. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे दोन्ही नेते अतिशय मित्रासारखे हसत चर्चा करत होते. त्यांच्याकडे पाहून ते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत, असं वाटणार देखील नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, या भेटीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. या भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नये, असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभा आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांचं नेमकं स्पष्टीकरण काय म्हणाले?
“खासदार सुनील तटकरे वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहे. विधीमंडळात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकांना भेटू शकतो. आमचे व्यक्तीगत संबंध असू शकतात. त्याचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेच कारण नाही. माझे इतर पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मात्र याचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
“मी शरद पवार यांच्यासोबत ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत ठाम आहे. शरद पवार सांगतील तीच आमची दिशा आहे. आता अजित पवारांसोबत गेलेले ६ आमदार हे माझ्या सोबत लॉबीत बसलेले होते. ३ आमदारांनी माझ्यासोबत जेवण केले. याचा अर्थ काही वेगळा होत नाही. त्यामुळे कोणीही गैरसमज निर्माण करु नका”, असं आवाहन त्यांनी केलं.
अजित पवारांकडून जयंत पाटील यांना भरघोस निधी
दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून आमदारांना निधी वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निधी वाटपात आमदार भरत गोगावले यांनी तब्बल 150 कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. तसेच जयंत पाटील यांनाही भरघोस निधी वाटप करण्यात आलाय. पण शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असेलेले आमदार जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांना निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे या विषयी वेगवेगळ्या चर्चा रायकीय वर्तुळात सुरु आहेत. यावरही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात निधी वाटप झालेला दिसत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शहरी मतदारसंघ आहे त्यामुळे नगरविकास खात्यामार्फत त्यांना निधी मिळू शकतो”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.