देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतल्या अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी, मुंबई पोलिसांत दोन पॉवर सेंटर?
देवेन भारती हे एक डॅशिंग आयपीएस अधिकारी आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले अधिकारी अशीही त्यांची ओळख आहे. याच देवेन भारतींवर आता मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी टाकण्यात आलीय.
मुंबई : मुंबई पोलिसात एक मोठा बदल करण्यात आलाय. मुंबईत आता पोलीस आयुक्तांसह आणखी एक विशेष पोलीस आयुक्त असेल. विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारतींनी पदभारही हाती घेतलाय. पण त्यामुळं 2 पॉवर सेंटर तयार झाल्याची टीका माजी गृहमंत्री वळसे पाटलांनी केलीय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले अधिकारी अशी ओळख असलेल्या देवेन भारतींवर मुंबई विशेष पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी टाकण्यात आलीय. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात नव्यानेच ही पदनिर्मिती करण्यात आलीय. नवं पद निर्माण करण्याची गरज का पडली? विशेष पोलीस आयुक्तांवर नेमकी काय जबाबदारी असेल? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
देवेन भारती हे एक डॅशिंग आयपीएस अधिकारी आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले अधिकारी अशीही त्यांची ओळख आहे. याच देवेन भारतींवर आता मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी टाकण्यात आलीय.
विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात नव्यानेच ही पदनिर्मिती करण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळासह पोलीस खात्यातही उलटसुलट चर्चांना सुरुवात झालीय. या चर्चा थांबत नाहीत तोच देवेन भारतींच्या ट्विटने सर्वांचंच लक्ष वेधलं. मुंबई पोलीस एक टीम आहे. इथे कोणीही सिंघम नसल्याचं ट्विट देवेन भारतींनी केलं.
देवेन भारती नेमके आहेत तरी कोण?
देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे 54 वर्षीय आयपीएस अधिकारी आहेत. देवेन भारती हे मूळचे बिहारमधील दरभंगाचे आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केलीय. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखेत काम केलंय. त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा आणि त्यानंतर सह पोलीस आयुक्त पदावरही काम केलंय.
देवेन भारती यांनी राज्यातील पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) आणि महाराष्ट्र ATS प्रमुख पदावरही काम केलंय. त्यांची देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले अधिकारी अशीही ओळख आहे.
राज्यात मविआ सरकार आल्यावर त्यांची राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक पदी बदली झाली. आता त्यांची मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. देवेन भारती यांनी विशेष पोलीस आयुक्त पदभार स्वीकाराला आहे.
मुंबईत पोलीस आयुक्त असताना, पुन्हा विशेष पोलीस आयुक्त कशासाठी? असा विरोधकांचा सवाल आहे. सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आहेत. आता विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती आल्यानं, त्यांचा नेमका काय रोल असेल, ते पाहणंही महत्त्वाचं आहे.
पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली कार्यरत सहपोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे, सहपोलीस आयुक्तांच्या कामावर देखरेख करणं, अशी भूमिका देवेन भारती निभावतील.
दरम्यान देवेन भारतींच्या नियुक्तीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. तर आदित्य ठाकरे यांनी मात्र सरकारला टोला लगावलाय.
मुंबई पोलिसांवर वाढती गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे नव्याने झालेली ही नियुक्ती कितपत प्रभावी ठरणार हे आता येणारा काळच ठरवेल.