Mumbai Boat Capsized: बोट अपघातात मृत्यू झालेल्या नौदल अभियंत्याची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Nilkamal Boat Accident: मुंबईतील बदलापुरातील मंगेश केळशीकर हे नौदलात मेकॅनिकल इंजिनियर आहे. ते स्पीड बोटच्या इंजिनाची टेस्टिंग करत असताना हा अपघात झाला. त्यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे. कुटुंबात मंगेश हेच एकमेव कमावते होते.
Nilkamal Boat Accident:मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ बुधवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 101 हून अधिक लोकांना बचावकार्यातून वाचवण्यात यश आले आहे. या अपघातात मृत्यू झालेले 10 नागरीक आहेत तर 3 नौदलातील कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्यात बदलापूरच्या मंगेश केळशीकर या नौदलातील अभियंताचा मृत्यू झाला आहे. मंगेश हे नौदलात मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. त्यांचा निधनामुळे केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. त्यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे.
मुंबईतील बदलापुरातील मंगेश केळशीकर हे नौदलात मेकॅनिकल इंजिनियर आहे. ते स्पीड बोटच्या इंजिनाची टेस्टिंग करत असताना हा अपघात झाला. त्यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे. कुटुंबात मंगेश हेच एकमेव कमावते होते.
नौदल बोटीच्या चालकावर गुन्हा
पोलीस उपायुक्त डीसीपी प्रवीण मुंडे यांनी या प्रकरणात नौदलावर चालकावर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. भरधाव वेगाने बोट चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपघातातील दोन जण बेपत्ता झाले आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतांची ओळख पटलेली आहे.
गेट ऑफ इंडियावर आज कसून तपासणी
नीलकमल बोट दुर्घटनेनंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गेट वे ते एलिफंटा प्रवासी बोट वाहतूक करणाऱ्या बोटींची कसून तपासणी गुरुवारी करण्यात आली. मेरिटाईम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ही तपासणी केली जात आहे. कोणताही निष्काळजीपणा आढळल्यास लायसन्स रद्द करण्याचा इशारा बोट चालकांना मेरिटाइम बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन सी. जे. लेपांडे यांनी दिला.
दरम्यान, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केला होता. तसेच या अपघाताची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदलाकडूनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.