शरद पवार, उद्धव ठाकरे काँग्रेसला एकटे पाडणार, बड्या नेत्याचे भाकीत
Nitesh Rane: उद्धव ठाकरे आणि शरद पवार गट मिळून काँग्रेसला एकटे पडण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच ते चित्र पाहायला मिळेणार आहे. पुढे जाऊन ते वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही धोका देणार आहे
मुंबई | दि. 4 मार्च 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे दिलेले शब्द पूर्ण करत नाहीत. त्यांच्या काळात कोकणातील शेतकऱ्यांना किती निधी मिळाला? सुशांतसिंग राजपूत बाबत प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला रस्त्यात अटक केली गेली होती. आता ते आणि शरद पवार गट मिळून काँग्रेसला एकटे पडण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच ते चित्र पाहायला मिळेणार आहे. पुढे जाऊन ते वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही धोका देणार आहे, असे भाकीत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
आव्हान स्वीकारायला तयार आहात का?
देशाच्या पंतप्रधानांवर बोललं की दिवसभर चर्चेत राहायला मिळत ही संजय राऊत यांना माहीत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्याची त्यांची सवय झाली आहे. ज्या व्यक्तीला स्वतःच घर सांभाळता आलं नाही, ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत मोदींजींना सल्ले देत आहेत. रात्रीची उतरली नसेल तर माणूस असाच बोलतो, असे नितेश राणे यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी करत आहेत, त्यांनी कोणते प्रकल्प सुरु केले? असा आरोप केला होता. त्यावर नितेश राणे यांनी जोरदार उत्तर दिले. संजय राऊत यांची तयारी असेल तर मोदींनी सुरू केलेले देशातील 50 प्रकल्प मी तुम्हाला दाखवतो. त्यासाठी येणारा सगळा खर्च मी करणार आहे. माझे आव्हान स्वीकारायला तयार आहात का? दुसऱ्यांच्या घरातल्या बारशाला जाऊन वडापाव खाण ही संजय राऊत यांची सवय आहे. नितीन गडकरी यांचे सोडा तुम्ही तुमच्या जुन्या सैनिकांना किती न्याय दिला, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला.
पाटणकर यांच्याकडे 10 हजार कोटी आले कसे
श्रीधर पाटणकर यांच्याकडे 10 हजार कोटी कसे आले? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे दिशा सालीयन आणि सुशांतसिंग राजपूत यांच्या आईवडिलांना भेटणार आहेत का? गुलाबराव पाटील बरोबर ते बरोबर आहे. भाजपा तडीपार होणार नाही. तर आदित्य ठाकरे तडीपार होणार आहे. त्यामुळे सध्या ते आईला घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत.
मराठा समाजाला न्याय फडणवीस यांनीच दिलाय
मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाज गांभीर्याने घेत नाही. जरांगे समाजबद्धल कमी पण राजकारण जास्त करत आहेत. त्यांच्या बोलण्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. मराठा समाजाला न्याय देवेंद्र फडणवीस यांनीच दिलाय, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.