‘लवकरच खरं काय ते बाहेर येईल’, नितीन देसाई यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया
ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कन्या मानसी देसाई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत चुकीची माहिती पसरवू नका, असं आवाहन केलं आहे. तसेच खरं काय आहे ते लवकरच समोर येईल, असंही त्या म्हणाल्या आहेत.
मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया समोर आली. चुकीची माहिती पसरवू नका. लवकरच खरं काय ते बाहेर येईल, असं नितीन देसाई यांच्या कन्या मानसी देसाई यांनी म्हटलं आहे. माझ्या वडिलांचा कुणाला धोका द्यायचा प्रयत्न नव्हता. कोविड संकटाचा परिणाम उद्योगावर झाला. त्यामुळे पैसे थकले. मात्र पैसे बुडवण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं मानसी देसाई यांनी म्हटलं आहे. वन टाईम सेटलमेंटसाठी कंपनीकडून टाळाटाळ करण्यात आली, असंही मानसी देसाई यांनी म्हटलं आहे. एडलवाईज कंपनीने वडिलांना खोटी आशा दाखवली, असंही मानसी देसाई यांनी म्हटलं आहे. खरं काय ते लवकरच बाहेर येईल, असं मानसी देसाई यांनी म्हटलं आहे.
मानसी देसाई नेमकं काय म्हणाल्या?
“मी मानसी नितीन देसाई. ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची मोठी मुलगी. मी माझ्या आई आणि परिवारातून हे स्टेटमेंट देत आहे. माझे बाबा नितीन चंद्रकांत देसाई 2 ऑगस्ट 2023 ला सोडून गेले. त्यानंतर मीडियामध्ये खूप गोष्टी आणि चुकीची माहिती पसरली आहे. हे स्टेटमेंट देण्याचा हात हेतू आहे की, ही दुखद घटना घडल्यानंतर मीडियाने त्यांच्याबद्दल लोन डिफार्मेंट आणि चुकीच्या गोष्टी पसरवायला सुरु केली. आम्ही त्यांची बाजू आणि त्यांच्यासोबत जे खरं घडलं तेच समजवायचा प्रयत्न करतोय”, अशी प्रतिक्रिया मानसी देसाई यांनी दिली.
“लोन 181 कोटींचं होतं. आम्ही फेब्रुवारी 2020 पर्यंत 86.31 कोटी रुपये परतफेड केले होते. त्यानंतर कोरोना संकट आल्यामुळे पूर्ण दुनिया थांबली. बॉलिवूडलाही त्याचा खूप धक्का बसला. बाबांकडे कामं नव्हती म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला. त्यामुळे हप्ते भरायला उशिर झाला. नियमितपणे हफ्ते भरता आले नाहीत”, असं मानसी देसाई यांनी सांगितलं.
“त्याआधी कर्जदार कंपनीने आमच्याकडे सहा महिन्यांचे आधीच पैसे मागितले होते. माझ्या वडिलांनी त्यांचं पवईतील कार्यालय विकून ते सहा महिन्यांचे पैसे दिले होते”, अशी प्रतिक्रिया मानसी देसाई यांनी दिली.