“तुमच्या डोळ्यात अश्रू येतील”, ऐका नितीन देसाई यांचा इर्शाळवाडीचा, रायगड पोलीस अधिक्षक यांनी सांगितलेला ‘हा’ किस्सा

| Updated on: Aug 03, 2023 | 10:47 PM

माणसं किती मोठी असतात याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कला दिग्दर्शक नितीन देसाई. 15 दिवसांपूर्वी ईर्शाळवाडी गावावर दरड कोसळली होती. त्यावेळी पोलिसांच्या मदतीसाठी नितीन देसाई धावून गेले होते. त्यांच्या आठवणी सांगताना रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अक्षरश: भावूक झाले.

तुमच्या डोळ्यात अश्रू येतील, ऐका नितीन देसाई यांचा इर्शाळवाडीचा, रायगड पोलीस अधिक्षक यांनी सांगितलेला हा किस्सा
Follow us on

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर कर्जाचं मोठं ओझं होतं. त्यातून ते प्रचंड मानसिक तणावातून जात होते. त्यांनी खूप मेहनत आणि जिद्दीने उभा केलेल्या एनडी स्टुडिओ कदाचित आपल्या हातून निसटून जाईल की काय? अशी धाकधूक त्यांना होती. ते प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत होते. पण ते कलाकार होते. ते खूप संवेदनशील आणि हळवे होते. त्यांच्यात प्रचंड माणुसकी होती. देसाई यांनी मंगळवारी मध्यरात्री एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. पण त्याआधी 15 दिवसांपूर्वी त्यांनी जे केलं होतं ते फार कमी लोकांना जमतं. ते स्वत: आर्थिक अडचणीत असताना त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता मदतीचा हात पुढे केला. हा किस्सा सांगत असताना रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे हे देखील भावूक झाले.

पंधरा दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये इर्शाळवाडी गावावर डोंगर कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. मात्र या दुर्घटनेच्या दिवशी मध्यरात्री नितीन देसाई यांनी दाखवलेल्या तत्परतेच कौतुक करत रायगड पोलीस अधिक्षकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंधरा दिवसांपूर्वीच इर्शाळवाडी गावावरती डोंगर कोसळून जवळपास 70 ते 80 लोकांचा मृत्यू झाला. त्या दुर्घटनेत पूर्ण गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. घटनेच्या पंधरा दिवसानंतर आत्महत्या केलेल्या नितीन देसाई यांची आठवण काढत दुर्घटनेच्या मध्यरात्री त्यांनी दाखवलेल्या तत्परतेच रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कौतुक केलं. यावेळी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी देसाई यांच्या निधनामुळे मनाला चटका लागल्याची भावना व्यक्त केली.

इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधिक्षक घटनास्थळी पोहोचत होते. घटनास्थळ हे गडाच्या पायथ्यापासून जवळपास दीड तासाच्या अंतरावर होतं. गावात अडकलेल्या जखमी लोकांना पायथ्याशी आणून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याच काम रेस्क्यू ऑपरेशनची टीम करत होती. मात्र अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध असणारी साधनसामग्री कमी असल्याने रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांच्या फोनवरून मध्यरात्री दीड वाजता कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना फोन केला होता.

उपलब्ध असणारी साधनसामग्री फारच अपुरी आहे आणि त्यामुळे काही टेन्टची व्यवस्था करता येईल का? असा प्रश्न घार्गे यांनी नितीन देसाई यांना विचारला होता. या प्रश्नावर कसलाही विलंब न करता पुढच्या 20 मिनिटात नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जतमधील एनडी स्टुडिओमधून अनेक टेन्ट म्हणजेच तंबू इर्शाळवाडीच्या पायथ्याशी पाठवले होते. मध्यरात्रीच्या सुमारास एका फोन कॉलवरती नितीन देसाई यांनी दाखवलेली तत्परता त्यावेळी फार मोठी होती, असं म्हणत नितीन देसाई यांच्या आठवणी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी जागवल्या.

या दुर्घटनेनंतर पुढचे तीन दिवस सातत्याने नितीन देसाई हे पोलीस अधिक्षकांकडे विचारपूस करत होते. काय हवं काय नको या गोष्टींची चौकशी करून पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्थाही स्टुडिओमध्ये त्यांनी केली होती, असं पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितलं.

दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी सोमनाथ घार्गे हे नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये गेले होते. देसाई यांच्यासोबत जेवण करून दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. महाराणा प्रताप आणि जोधा अकबर हे दोन महत्वाचे प्रोजेक्ट आपल्याला मिळाले असून त्यातून मी नव्याने उभारी घेईन, असा विश्वास त्यावेळी त्यांनी व्यक्त केला होता, असं पोलीस अधिक्षक घार्गे यांनी सांगितलं.

नितीन देसाई यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. अनेक कलाकारांनी त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केलंय. मात्र 10 दिवसांपूर्वी भेटलेल्या माणसाचा असा अंत पाहून सुरुवातीला मलाही धक्का बसला, अशी भावना पोलीस अधिक्षक घार्गे यांनी व्यक्त केली. एक सच्चा कलाकार, रंगमंच आणि स्वतःच्या कलेवर जीवापाड प्रेम करणारा माणूस म्हणजे नितीन देसाई होते, असं म्हणत त्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.