याद रखना, मै प्युअर चड्डीवाला हूँ… नितीन गडकरी कुणाला म्हणाले?; काय आहे किस्सा?
जोपर्यंत जनता जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सच्या आधारावर मतदान करेल तोपर्यंत राजकारण आणि समाजकारणात नेतेही तसेच येतील. पण जनता जागरूक होईल आणि या सर्व गोष्टीला महत्त्व देणार नाही आणि निवडणुकीत विचार करून मतदान करेल तेव्हा आपोआप परिवर्तन होईल, असा दृढ विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
मुंबई | 23 डिसेंबर 2023 : आपण विकासाची कामे केली तर लोक मते देतात. प्रत्येकवेळी जातीचं राजकारण करायची गरज नसते. अनेक लोक जातीधर्माच्या पलिकडे जाऊनही मतदान करतात. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना हा अनुभव आला आहे. हे अनुभव ते नेहमी सांगत असतात. पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या कार्यक्रमात त्यांनी असाच एक किस्सा सांगितला. मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन मै प्युअर चड्डीवाला हूँ. आरएसएसवाला हूँ, वोट देना है तो दो, नही दिया तो भी कोईबात नहीं. मैं काम करते रहूँगा, असं सांगितल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
काय होता किस्सा?
नागपूरमध्ये ताजबाग म्हणून एरिया आहे. 15 ते 20 हजार मुसलमान तिथे राहतात. कोव्हिडच्या काळात त्या भागात मी प्रचंड काम केलं होतं. तिथे मी मोठा कार्यक्रम केला. मी त्यांना म्हटलं, याद रखना मै प्युअर चड्डीवाला हूँ, आरएसएसवाला हूँ, वोट देना है तो दो नही तो मत दो. नही तो बाद में पछताना नही. तुमने वोट दिया तो भी काम करूंगा और नही दिया तो भी काम करुंगा. त्यानंतर सर्व मुल्ला मौलवी आले आणि म्हणाले. साब हमको सब मालूम है. पुढच्यावेळी आमच्या पेट्या मोजा. वोट में कुछ कमी पडी तो बोलना, असा किस्सा सांगतानाच जात, धर्म, पंथापेक्षा नेत्याने केलेलं काम, त्याचं चारित्र्य यावर मते मिळाली तर नेते चांगले होतील, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
मोजकीच लोक…
यावेळी त्यांनी कम्युनिस्ट नेते एबी वर्धन यांच्या आठवणींना उजाळा दिला. एबी वर्धन यांचं माझ्यावर खूप प्रेम होते. ते विद्वान होते. ते कम्युनिस्ट होते. त्यांनी विचाराशी तडजोड केली नाही. एखाद्या व्यक्तीचे विचार तुम्हाला पटत नसतील, पण आयुष्यभर विचाराशी प्रामाणिक राहून त्यासाठी जगणारी लोकं ही समाजात आदर्श असतात. काही मोजकी लोकं तयार होत असतात. परिस्थिती बदलत असते. काळाच्या ओघात गुणात्मक परिवर्तन करणं ही गरज आहे, असं गडकरी म्हमाले.
त्यांना आरक्षण दिलं पाहिजे
जात, पंथ, धर्माच्या पलिकडे जाऊन लोकांनी नेत्यांना मान्यता दिलीय हे राजकारणात अनेकदा सिद्ध झालं आहे. आंबेडकर दलित समाजाचे, शिवाजी महाराज मराठा समाजाचे, महात्मा फुले माळी समाजाचे हे किती दिवस चालणार आहे? हा देश कुठे नेणार आहोत आपण? म्हणून देशातील अस्पृश्यता आणि जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. माणूस जातीने नव्हे तर त्याच्या गुणाने श्रेष्ठ आहे यावर सर्वांचा व्यवहार असला पाहिजे. जातीचं राजकारण नाही करायचं हे मी ठरवलं आहे. मला माहीत आहे, त्याने माझं काही नुकसान होणार नाही. सामाजिक समता आणि आर्थिक समानता प्रस्थापित झाली पाहिजे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी काही काळासाठी आरक्षण दिलं पाहिजे. आम्ही जातीच्या चष्म्यातून पाहणार नाही, असं मानणारी पिढी उभी राहिली तर जाती व्यवस्था निघून जाईल, असं त्यांनी सांगितलं.