अन् योगी आदित्यनाथ आणि केजरीवाल यांना रुममध्ये कोंडलं… नितीन गडकरी यांनी सांगितलेला भन्नाट किस्सा काय?
स्वातंत्र्यानंतर आपल्या आणि पाकिस्तानच्या वाट्याला प्रत्येकी तीन तीन नद्या आल्या होत्या. पण आपल्या नद्यांचं पाणी पाकिस्तानला जात होतं. आम्ही प्रकल्प तयार करून हे पाणी वळवलं. त्यामुळे पाकिस्तान नाराज झाला होता. पण कायदेशीरदृष्ट्या आपण बरोबर होतो. त्यामुळे ते काहीच करू शकले नाहीत. मात्र, हे पाणी वळवल्याने आपल्या देशातील अनेक जिल्ह्यांचा फायदा झाला.
मुंबई | 22 डिसेंबर 2023 : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी कोणत्याही कार्यक्रमात जातात तेव्हा काही ना काही राजकीय गौप्यस्फोट करत असतात. राजकीय आठवणींना उजाळा देत असतात. तसेच राजकीय घडामोडींवरही भाष्य करत असतात. विलेपार्लेतील लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातही नितीन गडकरी यांनी एक भन्नाट किस्सा ऐकवला. थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका रुममध्ये कसं कोंडून ठेवलं होतं हा किस्साच त्यांनी सांगितला. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. पाणी प्रश्न आणि नदीजोड प्रकल्पावरही त्यांनी भाष्य करतानाच एक भन्नाट किस्सा ऐकवला. मी वॉटर रिसोर्स मंत्री होतो. त्यावेळी नदी जोड प्रकल्पासाठी मी 49 प्रकल्प तयार केले होते. तेव्हा राज्याराज्यात भांडणं होती. 23 भांडणं होती. 70 वर्षापासून ही भांडणं होती, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
महाराष्ट्र-कर्नाटक वादावर मार्ग शोधला होता
पाणी वाटपाच्या प्रश्नावरून निर्माण झालेली राज्याराज्यातील भांडणं सोडवण्यासाठी अनेक बैठका झाल्या. मिटिंगमध्ये भांडणं सुटायचीच नाही. मग मी सर्व मुख्यमंत्र्यांना बोलावलं. त्यांना एका रुममध्ये कोंडलं. शिपायाला दरवाजा बंद करायला सांगितलं. आणि जोपर्यंत तुम्ही पर्याय काढत नाही, तोपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही, अशी तंबीच मुख्यमंत्र्यांना दिली. मी योगीजींनाही कोंडलं होतं. केजरीवाल यांनाही कोंडलं होतं. त्यामुळे पटापट मार्ग निघाले. फक्त महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच तामिळनाडू आणि कर्नाटकाचा मार्ग निघाला नाही. त्यावरही मी उपाय शोधला होता. मात्र, हरयाणा, पंजाब, काश्मीर उत्तर प्रदेशकडची भांडणं मी मिटवू शकलो, असा किस्सा गडकरी यांनी ऐकवताच एकच खसखस पिकली.
पाकिस्तानचं पाणी रोखलं
स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तीन नद्या पाकिस्तानला मिळाल्या. तीन नद्या भारताला मिळाल्या. आपल्या नद्याचं अधिकाराचं पाणी पाकिस्तानात जात होतं. मी ते पाणी वळवलं. त्यासाठी प्रोजेक्ट तयार केले. आम्ही पाणी वळवल्यानं पाकिस्तान नाराज झाला. पण कायद्याप्रमाणे आपण बरोबर होतो, असं गडकरी म्हणाले. आता इंदिरा कॅनॉल आहे. त्याचं काँक्रिटीकरण केलं. त्यामुळे राजस्थानच्या नऊ जिल्ह्यांना पाणी मिळालं. त्यामुळे पाण्याची कमी नाही. पैशाची कमी नाही. ज्ञानाची कमी आहे. कमी फक्त काम करणाऱ्यांची आहे. काम केलं तर हे होऊ शकतं, असंही त्यांनी सांगितलं.