Video : ना सोबत पीए, ना पोलीस सुरक्षा, ना लवाजमा… गिरीश महाजन यांचा नांदेड ते मुंबई एकट्याने रेल्वे प्रवास

| Updated on: Jun 11, 2023 | 1:18 PM

एका शिफ्टमध्ये दहा दहा कॉन्स्टेबल घ्यायचे, पोलीस दलावर ताण निर्माण करायचा हे मला आवडत नाही. त्यामुळे मी संरक्षण घेतच नाही. हा माझा नेहमीचा नित्यक्रम आहे. 30 वर्षात मी अनेकदा या ट्रेनने प्रवास केला आहे. ट्रेनमध्येच झोपतो.

Video : ना सोबत पीए, ना पोलीस सुरक्षा, ना लवाजमा... गिरीश महाजन यांचा नांदेड ते मुंबई एकट्याने रेल्वे प्रवास
girish mahajan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : साधारणपणे आमदार असो की खासदार किंवा एखादा मंत्री यांच्यासोबत पोलीस, पीए आणि सुरक्षा रक्षकांचा गराडा असतो. एवढच कशाला साध्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याभोवतीही सुरक्षेचा लवाजमा असतो. दौऱ्यावर जाताना तर अनेकदा नेत्यांसोबत लवाजमा पहायला मिळतो. मात्र भाजपचे संकट मोचक आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे या सर्व प्रकाराला अपवाद आहेत. गिरीश महाजन यांनी कुणालाही न घेताच नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्यानी प्रवास केला. विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल नांदेडला सभा होती. सभेला उशिर झाल्याने गिरीश महाजन यांना ट्रेनने मुंबईला यावं लागलं. कारण ठाण्यात त्यांची आज सभा होती. म्हणून रात्री त्यांनी ट्रेन पकडली. स्वत:च आपल्या बॅगा घेऊन ते स्टेशनवर आले होते. ट्रेनमध्ये गेल्यावर त्यांनी सीटवर बॅगा ठेवल्या. त्यानंतर ट्रेनच्या सीटवर बेडशीट टाकलं. त्यानंतर काही वेळ वाचन केलं. आणि नंतर रात्री ते झोपी गेले. यावेळी त्यांच्यासोबत ना पीए होता, ना सुरक्षा रक्षक, ना पोलीस, ना कोणताही लवाजमा.

हे सुद्धा वाचा

नागपूरला जाणार होतो…

त्यानंतर गिरीश महाजन यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. काल अमित शाह यांची नांदेडला सभा होती. त्यानंतर रात्री कुठलाच पर्याय मला नव्हता. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रात्री नागपूरला जाऊन पुन्हा 10.30 वाजता मुंबईला येणार होतो. कार्यक्रमाला उशीर झाल्याने ते शक्य नव्हतं. त्यामुळे नांदेडला मी ट्रेन गाठून मुंबईला आलो. ठाण्याला माझी सकाळी सभा होती. त्यामुळे मी ट्रेनला बसलो. माझ्यासोबत पीए नाही, बॉडीगार्डही नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

एक शिपाई पुरेसा

असाही मी गेल्या 30 वर्षापासून आमदार आहे. मागच्या काळात मी पाच वर्ष मंत्री होतो. आताही मी मंत्री आहे. मी वाय प्लस सेक्युरीटी नाकारलेली आहे. कारण अपूर्ण मनुष्यबळ आणि वाहनांची संख्या कमी आहे. त्यात आम्हाला 22-22 पोलीस संरक्षणासाठी ते योग्य नाही. मला वाटतं, याची फार आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे मी आधीच लेखी देऊन सुरक्षा नाकारली आहे.

पूर्वीही मी पोलीस संरक्षण घेतलं नाही. मला एक पोलीस शिपाई पुरेसा होतो. एका शिफ्टमध्ये दहा दहा कॉन्स्टेबल घ्यायचे, पोलीस दलावर ताण निर्माण करायचा हे मला आवडत नाही. त्यामुळे मी संरक्षण घेतच नाही. हा माझा नेहमीचा नित्यक्रम आहे. 30 वर्षात मी अनेकदा या ट्रेनने प्रवास केला आहे. ट्रेनमध्येच झोपतो. मी नवीन काही केलंय असं वाटत नाही, असंही महाजन म्हणाले.

याआधी सुरक्षाही नाकारली

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी अतिरिक्त वाय+ सुरक्षा देखील नाकारली होती.