मुंबई: यूपीए कुठे आहे? असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यात दम आहे. पण काँग्रेसला वगळून कोणतीही आघाडी होऊ शकत नाही. कोणताही वेगळा फ्रंट केल्यास त्याचा भाजपलाच फायदा होईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी मोठ्या नेत्या आहेत. भाजपच्या विरोधात जी लढाई सुरू आहे. त्यातील त्या सर्वात महत्वाच्या योद्धा आहेत. इतर राज्यातही अनेक लोक लढत आहेत. ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एक संघर्ष केला आणि विजय मिळवला. तो प्रेरणादायी आहे. यूपीएचं काय करायचं हे हा सवाल केला जात आहे. यूपीए कुठे आहे? असं ममता बॅनर्जी विचारलं ते योग्य आहे. उद्धव ठाकरेंनीही वारंवार यूपीए मजबूत करावं असं म्हटलं आहे. देशाच्या राजकारणात यूपीएचं महत्त्व राहिलं पाहिजे. यूपीए नाहीये तर एनडीए तरी कुठे आहे? असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत, असं राऊत म्हणाले.
2024साठी वेगळा फ्रंट तयार होत असेल तर त्याचे फायदे आणि तोटे काय याचा विचार केला पाहिजे. आतापर्यंत अनेक फ्रंट झाले. थर्ड आणि फोर्थ फ्रंट झाले. त्याचा फायदा सर्वाधिक भाजपलाच होत आहे. जो फ्रंट तयार आहे. त्यालाच मजबूत करावं सर्वांनी मिळून असं आम्ही म्हटलं आहे. काँग्रेससोबत कुणाचे मतभेद असू शकतात. महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत. पण तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. महाराष्ट्र सर्वात मोठं उदाहरण आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. आमचे विचार वेगळे आहेत, आम्ही आपआपल्या पक्षाचा विस्तार करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यूपीएचं अस्तित्व नाही ही गोष्ट सत्य आहे. ममता बॅनर्जींच्या म्हणण्यात दमही आहे. पण काँग्रेसला दूर ठेवून कोणताही फ्रंट बनू शकत नाही. काँग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनवणं योग्य नाही. मध्यप्रदेशात, राजस्थान, हरयाणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यातही काँग्रेस आहे. काही राज्यात काँग्रेस कमजोर आहे. पण काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं नाही. काँग्रेसला इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेससोबत मिळून काम केलं तर चांगला फ्रंट तयार होईल, असं ते म्हणाले.
यूपीए कुठे आहे? असं विचारत असाल तर यूपीए महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडी यूपीएचचं प्रतिक आहे. त्यामुळे यूपीएबाबत सर्वांनी बसून विचार केला पाहिजे. ममता बॅनर्जींनी एक विचार ठेवला आहे. त्यांच्यासोबत चर्चा सुरूच राहील. आम्ही पुन्हा ममता बॅनर्जींना भेटणार आहोत. फ्रंट एकच बनला पाहिजे. सध्या सोनिया गांधी यूपीएला लीड करत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर कोणीही आक्षेप घेतलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं. वीर सावकरांबाबत आम्हालाच आम्हालाच बोलायला पाहिजे. आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेला. आम्ही डरपोक नाही. हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही कधीच यूटर्न घेतला नाही. आम्ही तडजोडी केल्या नाही. आजही सावरकर आमचे आदर्श होते आणि राहतील. सावरकर भारत रत्न आहेत. त्यांना भारतरत्न का दिलं जात नाही. सरकारसमोर काय समस्या आहे? असा सवाल त्यांनी केला.
आमच्या खासदारांनी काहीही वावगं विधान केलं नाही. मी स्वत: चौकशी केली. प्रभू श्रीरामाचा ज्यांनी अपमान केला. रामविलास पासवान यांनी काय विधान केलं होतं? त्यांना मांडीवर घेऊन बसला होतात ना? कोण कुणाला घेऊन बसलं या पेक्षा मनातील भावना काय आहेत हे महत्त्वाचं आहे, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.
संबंधित बातम्या:
दुसऱ्या लग्नाला विरोध करणाऱ्या आजीची मुंबईत हत्या, सात वर्षांनी नातू तिसऱ्या बायकोसोबत सापडला