मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांना ईडीने चौकशीसाठी मुंबईला बोलावलं आहे. त्यामुळे सदानंद कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब? असं सूचक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून सोमय्या यांच्या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सकाळी एक व्हिडीओ शेअर करून दापोलीतून सदानंद कदम यांना अटक केल्याचं म्हटलं होतं. सदानंद कदम हे अनिल परब यांचे सहकारी आहेत. तसेच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू आहेत. सदानंद कदम यांच्या अटकेच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. मात्र, सदानंद कदम यांना अटक केल्याबाबतची कोणतीही माहिती ईडीकडून देण्यात आली नव्हती. त्यानंतर सदानंद कदम यांची त्यांच्या दापोलीतील कुडेशी गावी जाऊन ईडीने चौकशी केली. चौकशीनंतर कदम यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना अधिक चौकशीसाठी मुंबईला नेत असल्याचं वृत्त आलं होतं. पण हे वृत्तही निराधार असल्याचं समोर आलं आहे. कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं नाही किंवा त्यांना अटकही करण्यात आलेली नाही. कदम यांना ईडीने चौकशीसाठी मुंबईला येण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं आहे. अनिल परब यांचे पार्टनर सदानंद कदम यांना अटक केली आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब? असं सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोमय्या यांनी एक व्हिडीओही व्हायरल केला आहे. त्यातही त्यांनी सदानंद परब यांना अटकेचा दावा केला असून परब यांना इशारा दिला आहे.
#Dapoli #SaiResort Scam #SadanandKadam Arrested (Anil Parab’s Partner)
ab
Kya Hoga Tera #anilparab @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 10, 2023
दरम्यान, दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी सदानंद कदम यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप संजय कदम यांनी केला आहे.
दापोली साई रिसॉर्ट घोटाळ्याप्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केली आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब? अटक करणं आणि ताब्यात घेणं हा टेक्निकल शब्दांचा खेळ आहे. बोली भाषेत आपण अटक केली असंच म्हणतो. ईडीने एकदा ताब्यात घेतल्यानंतर मग कोर्टात नेलं जातं. सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर आता आणखी बरेच घोटाळे बाहेर येतील. साई रिसॉर्ट हे हिमनगाचं टोक आहे. अजून केबल घोटाळा यायचा आहे. धमक्या देऊन किती खंडण्या गोळ्या केल्या जात होत्या याचा आकडा ऐकला तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही लाज वाटेल. हळूहळू ही माहिती समोर येईलच, असंही सोमय्या म्हणाले.