नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 28 जानेवारी 2024 : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत नोटिफिकेशन्स काढल्याने राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार असल्याने छगन भुजबळ यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ओबीसी आणि इतर समाजातील नेते भुजबळ यांच्या निवासस्थानी जमले आहेत. ओबीसी नेते यावेळी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. भाजप आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके, नाना शितोळे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे बैठकीला उपस्थित झाले आहेत. तसेच ओबीसी समाजातील महत्त्वाचे प्रतिनिधी सुद्धा बैठकीला उपस्थित झाले आहेत. ओबीसी नेत्यांसह सर्व मागासवर्ग समाजाच्या नेत्यांसोबतही चर्चा करण्यात येणार आहेत.
मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यावर ओबीसीसह इतर समाजातील बांधवांनी 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवण्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी बॅक डोअर एन्ट्री देण्यात आली आहे. ओबीसींना आरक्षणातून धक्का मारून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. त्यावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. घरांची जाळपोळ आणि पोलिसांवरील हल्ले आदी प्रकरणी गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर देखील चर्चेची शक्यता आहे. तसेच आजच्या बैठकीत काही ठोस कृती कार्यक्रम ठरण्याची शक्यता असल्याने छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी सुरू झालेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सरकारच्या निर्णयानंतर आता सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे. ओबीसी बांधवांनो आपल्या सर्वांसाठी रात्र वैऱ्याची आहे. आपल्यावर आलेल्या या झुंडशाहीच्या संकटाला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला तातडीने कायदेशीर मार्गाने प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे. छगन भुजबळांनी केलेल्या आवाहनानुसार ओबीसी समाजातील प्राध्यापक, वकील, शिक्षक यांच्यासह इतर सर्व सुशिक्षित बांधवांनी तातडीने आपल्या हरकती नोंदवा, असं आवाहन करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे.