CM Eknath Shinde: फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागतं.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, येणारे सगळे सण जल्लोषात साजरे होणार
दहीहंडीनंतर आता गणेशोत्सव निर्बंधमुक्त सारजरा करण्यात येतो आहे. यात पोलिसांनाही सांगितले आहे की सहकार्य जरा जास्तीचे असू द्या. ही आपली सस्कृंती, परंपरा आहे, ही आपल्याला पुढे वाढवायची आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई – आपले आकाशाला हात कधीच टेकणार नाहीत, आपण जमिनीवरच आहोत असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि मविआ सरकारवर टीका केली आहे. सरकार कुणाचं होतं आणि कोण चालवत होतं, हेही आपल्याला माहित असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. दहीसरमध्ये गणपती दर्शनाला गेले असताना मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यापुढे होणारे सगळे उत्सव (festivals)हे निर्बंधमुक्त असतील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
गणराय त्यांना सद्बुद्धी देवो
पावसातही लोकांचा उत्साह दुणावलेला आहे. पुण्यात नागरिकांचं स्वागत स्वीकारण्यासाठी लोकांमध्ये गेलो, तर फोटो काढण्यासाठी गेले अशी टीका झाली. पण फोटो काढण्यासाठीपण लोकं जवळ यायला लागतात ना, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. प्रेमाने लोकांना जवळ घ्यावेही लागते, कुणीही कुणाच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. गणराय या सगळ्यांना सद्बुद्धी येवो, अशी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. टीका करायची नाही, पण कामातून उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितले आहे.
पोलिसांनाही जास्तीचे सहकार्य करण्यास सांगितले
दहीहंडीनंतर आता गणेशोत्सव निर्बंधमुक्त सारजरा करण्यात येतो आहे. यात पोलिसांनाही सांगितले आहे की सहकार्य जरा जास्तीचे असू द्या. ही आपली सस्कृंती, परंपरा आहे, ही आपल्याला पुढे वाढवायची आहे. जर आपण निर्बंध लादत गेलो तर हे उत्सव कमी होतील, त्यामुळे आम्ही हे उत्सव जोरात साजरे करण्यासाठी निर्बंध कमी केल्याचे मुखयमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी गणेशोत्सव मंडळांचे पैसेही माफ केले असेही त्यांनी सांगितले. येणारा नवरात्रोत्सव हाही जोरात साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निगेटिव्हिटीचे वातावरण बदलले
दोन वर्षांनंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो आहे. येणारे सगळे सण जल्लोषात, उत्साहात, आनंदात साजरे करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. गेले दोन वर्षे असलेली निगेटिव्हिटीचे वातावरण बदल व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकार बदलले आहे, तर सगळेच बदलायला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.