लोअर परळ ( डीलाईल ) पुलाची एक मार्गिका वाहतूकीसाठी सुरू, जुलैअखेरीस पूर्ण क्षमतेने पुल सुरू
लोअरपरळ उड्डाण पुलाला धोकादायक ठरवून पाडल्यानंतर चार ते पाच वर्षे या पुलाचे काम सुरु आहे. या पुलाच्या ना. म. जोशी मार्गावरील पश्चिम बाजू ते गणपतराव कदम मार्गिकेचे काम पूर्ण झाले असल्याने ती बाजू वाहतूकीसाठी सुरू झाली आहे.
मुंबई : धोकादायक ठरल्यानंतर चार वर्षांपूर्वी पाडण्यात आलेल्या लोअर परळ पुलाची ( डिलाईल रोड ) पुलाची पश्चिमेकडील मार्गिका गुरूवार १ जूनपासून वाहनचालकांसाठी खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेच्या उपलब्धतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उर्वरित टप्प्यात पूर्व दिशेचा पूल जुलै २०२३ अखेरीस वाहतुकीसाठी संपूर्ण क्षमतेने खुला करण्याची पालिकेची योजना आहे. या पूलाचे काम गेली चार ते पाच वर्षे सुरू असल्याने लोअर परळ, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड, भायखळा परिसरात नागरिकांचे हाल होत आहेत.
लोअर परळ पश्चिमेला सेनापती बापट मार्ग जंक्शन येथून येणाऱ्या गणपतराव कदम मार्गावर उर्मी इस्टेट आणि पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क येथून रेल्वे स्पॅनपर्यंतची मार्गिका वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार खुली करण्यात आली आहे. याच पुलावर पुढे डावीकडे ना. म. जोशी मार्गावर वेस्टर्न रेल्वे वर्कशॉप आणि दादरच्या दिशेने जाणारी मार्गिका ही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. डिलाईल रोड पुलाच्या कामातील पूर्वेच्या दिशेची काही कामे आगामी कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामध्ये वाहतुकीसाठीच्या रॅम्पचे तसेच कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण, पथदिवे, रंगकाम इत्यादी कामे समाविष्ट आहेत. ही कामे पूर्ण करून पूर्व दिशेची मार्गिका जुलै अखेरीस सुरू करण्याचा मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाचा प्रयत्न असणार आहे.
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पदपथ बाहेरील बाजूला –
लोअर परळ येथील पुलाचे पुनर्बांधणीचे काम रेल्वेच्या हद्दीत पश्चिम रेल्वेकडून तर पालिकेच्या हद्दीत पूल विभागामार्फत करण्यात येत आहे. रेल्वे हद्दीत आधीच्या प्लेट गर्डर ऐवजी नवीन दोन ओपन वेब गर्डर बसविण्यात आले आहेत. रेल्वेवरील भाग ओलांडण्यासाठी पुलाच्या तसेच पादचारी यांच्या सुरक्षितेसाठी ओपन वेब गर्डरच्या बाहेरील बाजूने पदपथ बांधण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रात चार जिने व दोन सरकते जिने बांधून सदर पदपथ जोडण्यात येणार आहेत.
पुलाखाली अतिरिक्त भुयारी मार्ग –
जुना लोअर परळ पूल हा मातीचा भराव आणि दगडी बांधकामाद्वारे बांधण्यात आला होता. त्यामुळे बाजूचे सेवा रस्ते ( सर्व्हीस रोड ) अरुंद होते. तसेच पोहोच मार्गामधून क्रॉसिंगसाठी फक्त एक भुयारी मार्ग उपलब्ध होता. परंतु आता नव्याने बांधण्यात येणारा लोअर परळ पूल स्टील गर्डर वापरून बांधण्यात येत असल्यामुळे पुलाखाली क्रॉसिंग साठी मुबलक जागा उपलब्ध असणार आहे. तसेच बाजूचे सेवा मार्ग हे पूर्वीपेक्षा रुंद असणार आहेत.
८७ टक्के काम पूर्ण
लोअर परळ पूलाच्या पुनर्बांधणीच्या कामात ९० मीटर लांबीचे आणि ११०० टन वजनाचे दोन गर्डर हे पश्चिम रेल्वेच्या रूळांवर उभारणे हे सर्वात मोठे आव्हानाचे काम होते. त्यानंतर दक्षिण दिशेकडील भाग हा तोडकामासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये पालीकेकडे सोपविण्यात आला. पश्चिम रेल्वेने याठिकाणी २२ जून २०२२ रोजी पहिला स्टील गर्डर तर दुसरा गर्डर २४ सप्टेंबरमध्ये लाँच केला. सध्या लोअर परळ पुलाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम जुलै २०२३ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे.