महाराष्ट्र चिंब, राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यात?
सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्याचबरोबर सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडले आहे. तर नदीकाठच्या शेतामध्ये वारणेचे पाणी शिरल्याने ऊस आणि अन्य पिके पाण्यामध्ये गेले आहेत.
मुंबई आणि उपनगरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज विश्रांती घेतली आहे. परंतु विदर्भात दमदार पाऊस सुरु आहे. रविवारी राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. राज्यात २३ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. रविवारी ठाणे , पुणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, धाराशीव, बीड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोदींया, भंडारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
मुंबईत विश्रांती, नागपुरात पुन्हा कोसळणार
गेले दोन दिवसांपासून पावसाची संततधार मुंबईत सुरु होती. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने काही सखल भागत पाणी सचल्याची घटना होत्या. परंतु रविवारी पावसाने विश्रांती घेतली आहे. कल्याण डोंबिवली परिसर ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. नागपुरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. सात तासांत 227 मिमी पावसाची नोंद नागपुरात झाली. रविवारी सकाळी सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. परंतु हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केले आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढणार का याकडे लक्ष लागले आहे.
विदर्भात सर्वत्र पाऊस
चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाची संततधार सुरुच आहे. इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून 462 क्यूबिक मीटर प्रति सेकंद या वेगाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने इरई नदीकाठच्या गावांसह चंद्रपूर शहरातील रहिवाशांना दिलाय सतर्कतेचा इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात रविवारी सकाळीच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात रात्री साडेदहा वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
गडचिरोलीत घरांमध्ये पाणी शिरले
गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे- गडचिरोली शहरातील राधे बिल्डिंग परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले व रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद असून सध्या गंभीर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाली. नागपूरमध्ये बेसा रोडवरील मेडिकल शॉपमध्ये पाणी गेले आहे. दुकानातील औषधी पाण्यात तरंगताना दिसत आहे.
वारणेच्या पाण्याच्या पातळीत वाढ
सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. त्याचबरोबर सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडले आहे. तर नदीकाठच्या शेतामध्ये वारणेचे पाणी शिरल्याने ऊस आणि अन्य पिके पाण्यामध्ये गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
शहापूर शहरासह ग्रामीण भागात पडत असणाऱ्या सततच्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या, ओढे प्रवाहित झाले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ५३ टक्के, तर बारवी धरणात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे.तर तानसा धरणात ७७ टक्के पाणी साठा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली. गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 115 मीटर इतका विक्रमी पाऊस झाला. हवामान खात्याकडून आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. मंडणगड तालुक्यात तब्बल 168 मिलिमीटर पाऊस झाला. त्याचा खालोखाल दापोलीमध्ये 142 मीटर पाऊस झाला. दक्षिण रत्नागिरीमध्ये सर्वच तालुक्यात 100 मिलिमीटर होऊन अधिक पाऊस झाला. एक जूनपासून आत्तापर्यंत पावसाने 69 टक्के सरासरी गाठली आहे.