अखेर पंकजा मुंडे मोठ्या फरकाने विजयी; वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष
विधानसभा निवडणुकीतील पराभव. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं राजकारण कसं असेल अशी चर्चा सुरू होती. पंकजा मुंडे यांचं राजकारण संपलंय का? असंही दबक्या आवाजात म्हटलं जात होतं. पण भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं. त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय राहण्याचे संकेत मिळाले.
आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेत पोहोचल्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्याने वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष करण्यात येत आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्याने त्या मंत्री होणार का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झालं. 12 उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत काय होणार? अशी चर्चा होती. खासकरून सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या पंकजा मुंडे यांचं काय होणार? अशी चर्चा सुरू होती. संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली. पंकजा मुंडे यांनी विजयासाठी निर्धारीत करण्यात आलेल्या कोट्यापेक्षा अधिक मते घेऊन विजय मिळवला आहे. विजयासाठी 23 मते आवश्यक होती. पण पंकजा मुंडे यांनी 26 मते मिळवली आहेत. त्यांनी तीन अतिरिक्त मते घेतली आहेत. त्यामुळे अखेर पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला आहे.
धाकधूक वाढली
पंकजा मुंडे यांना पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत आधी एक, नंतर 6, नंतर 7 आणि 10 मते मिळाली. संथगतीने पंकजा मुंडे यांची मते वाढत असल्याने धाकधूक वाढली होती. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांचे चेहरे खिन्न झाले होते. पण पंकजा मुंडे यांनी मतांचा आवश्यक कोटा पूर्ण करून विजय मिळवताच सर्वांचे चेहरे खुलले.
आणि जल्लोषाला सुरुवात
पंकजा मुंडे यांचा विजय झाल्याचं कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. वरळी या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानापासून परळीपर्यंत जल्लोष करण्यात आला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
परळीत फटाक्यांची आतषबाजी
पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीडच्या परळी येथील यशश्री निवासस्थानी मुंडे समर्थकांनी जल्लोष केला. परळीतील पंकजा मुंडे यांच्या यशश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय. गुलाल आणि फटाक्याची आतिषबाजी करत मुंडे समर्थक आनंद व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी मुंडे समर्थकांमधून होत होती. आज अखेर विधान परिषदेवर पंकजा मुंडे या निवडून आल्या आहेत. आणि हाच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय.
सर्वांना होती धाकधूक
पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं नव्हतं. मात्र, त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी देण्यात आली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीटही देण्यात आलं. पण या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांचं राजकीय करिअर धोक्यात आल्याची चर्चा होती. पण पक्ष नेतृत्वाने पंकजा मुंडे यांना थेट विधान परिषदेचं तिकीट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पुन्हा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.