घड्याळाचे काटे फिरले… चिन्ह गेलं, पक्ष गेला; शरद पवार यांच्याकडे पर्याय काय?
अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्याने अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत. पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहे. तसेच पक्षाचे प्रतोदपदही अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे.
मुंबई | 6 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या 63 वर्षाच्या राजकारणातील शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला आहे. तसेच चिन्हही गेलं आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि केलेले युक्तिवाद यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ऐन राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता शरद पवार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरला आहे. तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणं. पवार गटाकडून आता पक्ष आणि चिन्हासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे. कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल कधी लागेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हा शिवाय राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. त्याचा फटका पवार गटाला निवडणुकीत बसण्याची अधिक शक्यता आहे.
अजित पवारच अध्यक्ष
दरम्यान, अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्याने अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत. पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहे. तसेच पक्षाचे प्रतोदपदही अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे. व्हीप न पाळल्यास शरद पवार गटाचे आमदार आणि खासदाही अपात्र होऊ शकतात असं सांगितलं जात आहे.
शरद पवार यांना नवं चिन्ह मिळणार
दरम्यान, शरद पवार गटाला नवं चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव मिळणार आहे. शरद पवार गटाला पक्षाचे नवे नाव सूचवावे लागणार आहे. तसेच चिन्हही सूचवावे लागणार आहे. हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर त्याची छाननी करूनच निवडणूक आयोग त्यांना हे चिन्ह आणि नाव देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.