Lata Mangeshkar | मी नि:शब्द, लतादीदींच्या जाण्याने देशात पोकळी निर्माण झालीय; मोदी, राष्ट्रपतींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त

आपल्या जादूई आवाजाने जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे.

Lata Mangeshkar | मी नि:शब्द, लतादीदींच्या जाण्याने देशात पोकळी निर्माण झालीय; मोदी, राष्ट्रपतींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त
मी नि:शब्द, लतादीदींच्या जाण्याने देशात पोकळी निर्माण झालीय; राष्ट्रपतींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 2:24 PM

मुंबई: आपल्या जादूई आवाजाने जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी लतादीदींच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नाही. दयाळू आणि सर्वांची देखभाल करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते कधीच भरून निघणारं नाही. आपल्या सूरेल आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्यात अद्वितीय क्षमता होती. भारतीय संस्कृतीच्या दिग्गज म्हणून येणारी पिढी त्यांना कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ram nath kovind)  यांनीही ट्विटरवरून लतादीदींना श्रद्धांजली वाहताना त्यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकापाठोपाठ तीन ट्विट केली आहेत. लतादीदींनी अनेक दशके फिल्मी जगतातील बदल पाहिला. सिनेमापलिकडे भारताच्या विकासाबाबत त्या विचार करायच्या. त्यांना नेहमी एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. लतादीदींसोबत अनेकदा गप्पा झाल्या. त्या अविस्मरणीय होत्या. लतादीदींच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. त्यांच्या कुटुंबासोबत मी संवाद साधला. त्यांच्या प्रती माझ्या संवेदना आहे, असं ट्विट मोदींनी केलं होतं.

दैवी आवाज लोपला- राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. लतादीदींचं निधनाची बातमी जशी जगभरातील लोकांसाठी धक्कादायक आहे. तशीच माझ्यासाठीही धक्कादायक आहे. त्यांच्या गाण्याने संपूर्ण देशाला मोहून टाकले होते. एखादा कलाकार देशात एकदाच जन्माला येतो. माणूस म्हणूनही लतादीदी महान होत्या. जेव्हा मी तेव्हा भेटलो तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवले. एक दैवी आवाज आज लोपला आहे. पण त्यांचे सूर कायम राहतील, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे.

अलौकीक स्वर हरपले- शरद पवार

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परिसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, अशी भावना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी ब्रीच कँडीत जाऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मंगेशकर कुटुंबाचे सांत्वनही केलं.

स्वर युगाचा अंत झाला- मुख्यमंत्री

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील. लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?

अलौकिक प्रतिभेच्या धनी- गडकरी

केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केलं. लतादीदी या देशाची शान आणि संगीत जगतातील स्वर शिरोमणी होत्या. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झालं आहे. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. सर्व संगीताच्या साधकांसाठी त्या प्रेरणादायी होत्या. त्यांनी 30 हजाराहून अधिक गाण्यांना स्वर देऊन संगीताच्या दुनियेला स्वरसाज चढवला आहे. त्या खूप शांत होत्या आणि अलौकीक प्रतिभेच्या धनी होत्या. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मी त्यांची गाणी ऐकत असतो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला- कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते. भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते. आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाईगीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच  कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला. लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख होत्या. चित्रपट व संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या. भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील. या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना आशाताई, उषाताई, मीनाताई, पं. हृदयनाथ तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना कळवतो. लतादीदींच्या देशविदेशातील करोडो चाहत्यांना देखील आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

एका युगाचा अस्त: सोनिया गांधी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आज एका युगाचा अस्त झाला आहे. लतादीदी सदैव अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

त्यांचा आवाज अमर आहे: राहुल गांधी

लता मंगेशकर यांच्या निधनाची दुखद बातमी ऐकली. अनेक दशकांपासून त्यांनी आपल्या आवाजाने भारतीयांच्या मनावर गारुड निर्माण केलं. त्यांचा आवाज सदैव अमर राहील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

संगीत क्षेत्रात भरीव योगदान: आंबेडकर

पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. त्यांनी चित्रपट संगीत, भाव संगीत व अभंग गीत गायनातून भारतीय संगीत क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे, अशा शब्दात वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

स्वर्गीय सूर हरपला- अजित पवार

“‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला – जयंत पाटील

मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केली आहे. लतादीदी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली गीते आपल्यात कायम राहतील. मला आठवतंय की एक वेळ होती, जेव्हा सकाळी रेडिओ ऑन करून दिदींच्या आवाजाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्यांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन देत त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला त्यावेळचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

संबंधित बातम्या:

Lata Mangeshkar | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

Lata Mangeshkar | पहिल्यांदा गाण्यातून लतादीदींनी कमावले होतो अवघे 25 रुपये! त्याचा खास किस्सा

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांनी लग्न का केलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो! त्याचंच ‘हे’ उत्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.