BREAKING | मुंबईत पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांसाठी सर्वात मोठी बातमी
पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून हजारो युवक मुंबईत धडकत आहेत. अनेकजण मैदानी चाचणी देत आहेत. अजूनही मैदानी चाचणी सुरु आहे. पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी ही मरोळ मैदान येथे घेण्यात येत आहे. असं असताना मुंबईत पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे अनेक खेड्यापाड्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांना देखील छळताना दिसतोय. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण सध्या मुंबईत दाखल होताना दिसत आहेत. अनेकांची मैदानी चाचणी पार पडल्या. पण अजूनही अनेकांच्या मैदानी चाचण्या पार पडायच्या बाकी आहेत. असं असताना मुंबईत काल रात्री अचानक पाऊस आला आणि घात झाला. पोलीस भरतीसाठी मुंबईत आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. खरंतर सोय अशी त्यांच्यासाठी मुळात काही नाहीच. पण त्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावत आणखी त्रास वाढवला. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आलीय.
पोलीस भरतीसाठी मुंबईत येणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईत काल रात्री अवकाळी पाऊस पडल्याने अंधेरीच्या मरोळ येथे असलेल्या मैदानाची दुरावस्था झालीय. मैदानाच्या जवळ परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे तर प्रचंड हाल झालेच. पण दुसरीकडे मैदानाची देखील दुरावस्था झालीय. त्यामुळे प्रशासनाने पुढच्या दिवसांची चाचणी घेण्यासाठी दुसऱ्या मैदानाची निवड केली आहे.
पोलीस भरतीची मैदानी चाचणी आता कुठे होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीसाठी येत्या 15 आणि 16 एप्रिलची होणारी मैदानी चाचणी ही मरोळ मैदानावर होणार नाही. तर ही मैदानी चाचणी कलिना मैदानात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे राज्यात अजूनही अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मैदानी चाचणीत पुन्हा व्यत्यय येण्याची भीती आहे.
दरम्यान, मुंबईतील मरोळ परिसरात माजी सैनिक यांच्या रिक्त पदासाठी पोलीस भरती होती. पण रात्री मरोळ परिसरात अवकाळी पाऊस पडल्याने मैदान आणि प्रशिक्षण केंद्रावरील टेंट उडून गेल्याने चाचणीसाठी आलेल्या माजी सैनिकांची मुंबई विद्यापीठ मैदानात चाचणी प्रक्रिया सुरू झाली. अचानक जागा बदलल्याने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची तारांबळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले.
राज्यात एकीकडे शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. अवकाळी पावसामुळे पिचलेल्या याच शेतकऱ्यांचे लाखो मुलं आज खाकीसाठी धडपडत आहेत. ते महाराष्ट्र पोलिसात नोकरी मिळवण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करत आहेत. मैदानी चाचणी आधी अनेक गाव-खेड्यातील मुलं सकाळी चार वाजता उठून धावण्याचा सराव करतात. गोळाफेकची तयारी करतात. पोलीस होण्यासाठी अथक परिश्रम करतात. आपण पोलीस झालो तर आपल्या शेतकरी वडिलांना आपला अभिमान वाटेल, याशिवाय आपल्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल, असा विचार तरुणांचा असतो. त्यासाठीच शेतकऱ्यांची मुलं आज मुंबईत पोलीस भरतीसाठी येत आहेत. पण क्रूर अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा मुलांनाही सोडत नाहीय.