भाजप नेत्यांना शाईफेकीची धास्ती, पत्रकार परिषदेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पत्रकाराची चौकशी, नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेची इतर भाजप नेत्यांनी धास्ती घेतल्याचं दिसतंय.
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली. वादग्रस्त विधान आणि त्यानंतरच्या घटनांवर वादहा रंगला. शाईफेकीचं प्रकरण पोलीस निलंबन आणि एका पत्रकाराच्या चौकशीपर्यंतही गेलं. अखेर पाटलांनी विधानाबद्दल माफी मागून त्यांच्या बाजूनं वाद थांबवला. मात्र शाईफेकीच्या घटनेची इतर भाजप नेत्यांनी धास्ती घेतल्याचं दिसतंय.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या ताफ्यावर परभणीत हल्ल्याचा प्रयत्न झाला. या राड्यानंतर बावनकुळे परभणी शहरात पोहोचले. तिथं त्यांची पत्रकार परिषद झाली. मात्र पत्रकार परिषदेलायेणारे सर्व पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली.
पिंपरी-चिंचवडमधल्या शाईफेकीत पत्रकाराची चौकशी थांबवण्याचं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलंय. मात्र त्याआधी शाईफेकीच्या प्रकारात एका पत्रकाराचाही समावेशाचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला होता.
बावनकुळेंच्या पत्रकार परिषदेला जवळपास २५ हून जास्त पत्रकार उपस्थित होते. मात्र पत्रकारांच्या खिशात शाईचा पेन आहे का? याची विचारपूस पोलीस करत होते.
सध्याच्या जमान्यात शाईचा पेन कुणीच वापरत नसल्यामुळे पोलिसांना एकाही पत्रकाराकडे शाईचा पेन सापडला नाही. मात्र पत्रकारांबरोबरच परिषदेला येणाऱ्या इतरांच्याही खिशाला शाईचा पेन नाहीय ना, याची खातरजमा पोलिसांनी केली. आणि त्यानंतरच पत्रकार परिषदेसाठी आतमध्ये सोडण्यात आलं.
एकीकडे चंद्रकांत पाटलांनी शाईफेकीचा वाद थांबवण्याचं आवाहन केलंय. मात्र दुसरीकडे भाजपचेच नेते पाशा पटेल चंद्रकांत पाटलांच्या विधानाचं समर्थन करुन शांत झालेला वाद पुन्हा उकरु पाहतायत का? असा प्रश्न विचारला जातोय.