MLA Disqualification Case | पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर, निकालाआधी हालचाली वाढल्या
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी हालचालींना प्रचंड वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला दाखल झाल्या आहेत. तसेच ठाकरे गटातही जोरदार हालचाली घडत आहेत.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही क्षण बाकी असताना पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘सागर’ निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे काल रात्री उशिरा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिंदे, फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्यात बैठक पार पडली होती. त्यानंतर पुन्हा रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्या आहेत. आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. नाशिक पोलिसांनी नुकतंच आजपासून 15 दिवस मनाई आदेश लागू केल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात जोरदार हालचाली सुरु आहेत. ठाकरे गटाच्या सर्व वकिलांची आज झूम कॉल मीटिंग झालीय. या बैठकीत निकालासंदर्भात विचारमंथन झालं. वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे देखील या बैठकीत उपस्थित होते. ठाकरे गटाच्या नेत्यांनी निकालाधी वरिष्ठ वकिलांचं मार्गदर्शन घेतलं आहे. निकाल जर विरोधात गेला तर आजच ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार?
आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही क्षण शिल्लक आहेत. या क्षणांची महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहतोय. अखेर आज तो दिवस उगवला आहे. हा निकास कोणाच्या बाजूने लागले याबाबत उत्सुकता आहे. हा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला तर राज्यात फार काही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार नाहीत. पण निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या विरोधात लागला तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा अभूतपूर्व असा मोठा राजकीय भूकंप घडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालावर महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, विधान भवन परिसरात आता हालचाली वाढल्याची माहिती समोर येत आहे.