मुंब्रा सम्राट जितूउद्दीन खान, मॉडर्न अफजल खानाचे करायचे काय? तुम्हीच सांगा महाराज… जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भांडूपमध्ये वादग्रस्त बॅनर्स

| Updated on: Jan 06, 2023 | 9:43 AM

या बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढताना दाखवण्यात आले आहेत. बाजूलाच जितेंद्र आव्हाड यांनाही दाखवण्यात आलं आहे.

मुंब्रा सम्राट जितूउद्दीन खान, मॉडर्न अफजल खानाचे करायचे काय? तुम्हीच सांगा महाराज... जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भांडूपमध्ये वादग्रस्त बॅनर्स
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भांडूपमध्ये वादग्रस्त बॅनर्स
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंजेबाने विष्णूचं मंदिर पाडलं नव्हतं असं म्हटलं होतं. त्यावरून औरंगजेब हा हिंदूद्वेष्टा नव्हता असं आव्हाड यांना म्हणायचं आहे काय? असा सवाल करत सत्ताधाऱ्यांनी आव्हाड यांना घेरलं आहे. या मुद्द्यावर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही वाद सुरूच आहे. आता हा वाद गल्लीपर्यंत पोहोचला आहे. आज भांडूपमध्ये रस्त्यांवर आव्हाडांविरोधातील बॅनर्स झळकले. त्यात आव्हाडांचा उल्लेख मुंब्रा सम्राट जितूउद्दीन खान असा करण्यात आला आहे. या वादग्रस्त पोस्टर्समुळे एकच खळबळ उडाली आहे.

भांडूप येथे पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाताना हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवरील मजकूर धक्कादायक असून जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारा आहे. रात्रीच्या अंधारात कोणी तरी हे बॅनर्स लावले असावेत. हे बॅनर्स नेमके कुणी लावले? याची माहिती मिळालेली नाही. मात्र, या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

मुंब्रा रक्षक जितूउद्दीन खान. महाराज… औरंगजेबाचे उद्दातीकरण करणाऱ्या मॉडर्न अफजल खानाचे (जितूउद्दीनचे) करायचे काय? तुम्हीच सांगा महाराज, असं या बॅनर्सवर म्हटलं आहे. काही बॅनर्सवर मुंब्रा सम्राट असाही जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर काही बॅनर्सवर आव्हाड यांचा चेहरा काळा करण्यात आला आहे.

या बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढताना दाखवण्यात आले आहेत. बाजूलाच जितेंद्र आव्हाड यांनाही दाखवण्यात आलं आहे. मात्र, आव्हाड यांना अफजल खानाच्या पोशाखात दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

या बॅनर्सची चर्चा सुरू होताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पूर्व द्रुतगती मार्गावर जाऊन ही सर्व बॅनर्स तातडीने काढून टाकली आहेत. राज्यातील सामाजिक एकोपा कायम राहावा आणि कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून पालिकेने ही कारवाई केल्याचं सांगितलं जातं. शिवाय हे बॅनर्स अनधिकृतपणे लावण्यात आले होते. त्यामुळेही पालिकेने कारवाई केली आहे.

दरम्यान, या बॅनरबाजीवर जितेंद्र आव्हाड यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आव्हाड या प्रकरणावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.